पोषण आहार ‘रडारवर’! होणार किमान 10 शाळांची तपासणी | पुढारी

पोषण आहार ‘रडारवर’! होणार किमान 10 शाळांची तपासणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार दिला जावा, यासाठी भरारी व दक्षता पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. या पथकांना कोणत्याही शाळेत जाऊन आता पोषण आहार तपासण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे बंधनकारक केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहावी, विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे व यातून त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित व्हावी, यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येते.

वर्षाला एक हजारहून अधिक कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेंतर्गत 86 हजारांवर शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ मिळवून देण्यात येतो. या शालेय पोषण आहार तपासणीसाठी सर्व मनपा आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना भरारी पथके नियुक्त करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा किमान 10 शाळांची तपासणी पथकामार्फत केली जाणार आहे, तर प्रमुख अधिकार्‍यांनी शाळांना महिन्यातून किमान दोन भेटी देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भरारी पथकांनी शाळा तपासणी केलेल्या शाळांच्या संख्येबरोबरच शाळांची नावेही सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पथकांनी खरेच शाळांची तपासणी केली का? याची फेरपडताळणीही करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालया कडून देण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button