राज्यातील साडेतेरा लाख शेतकऱ्यांना आज मिळणार नमो किसान योजनेचा पहिला हप्ता | पुढारी

राज्यातील साडेतेरा लाख शेतकऱ्यांना आज मिळणार नमो किसान योजनेचा पहिला हप्ता

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी केवायसी विशेष मोहीम राबविल्यामुळे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्या आदेशावरुन ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात आली होती. कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता या मोहिमेद्वारे केली होती.

पीएम किसान योजना सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्याचे २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button