काळजी वाढवणारी बातमी ! 40 तालुके दुष्काळाच्या छायेत ?

काळजी वाढवणारी बातमी ! 40 तालुके दुष्काळाच्या छायेत ?

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील दुष्काळी स्थितीच्या (ट्रिगर 2) 15 जिल्ह्यांतील 42 तालुक्यांतील अहवाल कृषी विभागाने अंतिम करून मंत्रालयस्तरावर पाठविला आहे. त्यामध्ये दुष्काळाची तीव्रता निश्चित करून पाठविलेल्या अहवालावर मदत व पुनर्वसन विभागाची बैठकही झाली असून, सुमारे 40 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या :

राज्यात सलग 21 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे (ट्रिगर 1) संबंधित ठिकाणी विमा कंपन्यांना नुकसानीचे 25 टक्के रक्कम देण्याबाबतच्या सूचना कृषी आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. त्यानंतरच्या सर्वेक्षणानुसार 15 जिल्ह्यांतील 48 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. त्यावर दुष्काळाची तीव्रता तपासण्याच्या सूचना कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर दिल्या होत्या. त्यानुसारचा अहवाल मागील शुक्रवारी (दि. 20) प्राप्त झाला. याबाबतचा अंतिम अहवाल कृषी विभागाने मंत्रालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असून, कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील संबंधित 42 तालुक्यांपैकी पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता तपासली असता ती सामान्य आढळली आहे. त्यामुळे हे दोन तालुके वगळले जाऊन उर्वरित 40 तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता घोषित होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने संबंधित 40 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा केल्यास शेतकर्‍यांना नेमक्या कोणत्या सवलती मिळतील, याकडे लक्ष लागलेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news