लातूर; पुढारी वृतसेवा : मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक वळणावर आली असता सरकारची मराठा आरक्षणाबद्दल कोणतीही ठोस भूमिका घेण्याची तयारी दिसत नाही. सरकारने मराठा समाजाला टिकणारे १६ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी आमची मागणी असून त्यासाठी १ नोव्हेबर रोजी आपण महामेळावा घेवून टेंभी येथे अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीसमोर राष्ट्रीय महामार्गावर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेच्या केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी सोमवारी (दि.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जावळे म्हणाले राजकीय स्वार्थासाठी सर्वच पक्षाने आजवर मराठा समाजाचा वापर केला. त्यात मराठा समाजाच्या नेत्यांनी तर समाजाचे वाटोळे केले. मराठा समाजाचे आरक्षण लटकवण्यात खऱ्या अर्थी हे पाच ते दहा टक्के प्रस्थापित मराठेच कारणीभूत आहेत.नारायण राणे , रामदास कदम , शरद पवार , फडणवीस अशा अनेक राजकारण्यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. ज्याच्याकडे कुणबी म्हणून पुरावे आहेत त्यांनी कुणबी म्हणून आरक्षण घ्यावे त्यास आमचा विरोध नाही सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देणे शक्य असेल तर तेही जरूर द्या ते शक्य नसेल तर मराठ्यांना १६ टक्के स्वंतत्र आरक्षण द्या. राज्याला होत नसेल केंद्रात त्यांचीच सत्ता आहे त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन हा प्रश्न मार्गी लावावा असेही जावळे म्हणाले. मनोज जरांगे पाटील असो वा अन्य कोणीही जे कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढत आहेत त्या सर्वांनाच आमचा पाठींबा आहे. आमच्या संघटनेच्या २२जिल्ह्यांत शाखां आहेत मी मांडलेली भूमिका त्या सर्वांचीच आहे. २४आक्टोबर रोजी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलेली डेडलाईन संपत आहे. त्यामुळे आम्ही १ नोव्हेंबर रोजी टेंभी येथे सकाळी १२ वाजता महामेळावा घेऊन आम्ही आमची भूमिका जाहीर करु पुढे जे काही होईल त्यास सरकारच जबाबदार राहील असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रा. सत्यशील सांवत यांची उपस्थिती होती.