सहा महिन्यात तब्बल पाच अपघात ! अखेर रेडबर्ड एव्हीएशनचे कामकाज निलंबित | पुढारी

सहा महिन्यात तब्बल पाच अपघात ! अखेर रेडबर्ड एव्हीएशनचे कामकाज निलंबित

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती औद्योगिक वसाहत परिसरात कार्यरत असलेल्या रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अँकेडमी वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे देशभरातील कामकाज तत्काळ निलंबित करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (डीजीसीए)चे डायरेक्टर फॉर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत. या ॲकेडमीकडून गेल्या सहा महिन्यात पाच अपघात घडले आहेत. त्यामुळे ही ॲकेडमी चर्चेत आली होती. टेक्नम पी 2008जे या विमानाचा अपघात झाल्याची नोंद घेत डीजीसीए यांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात कंपनीला ईमेल पाठवून तातडीने कामकाज निलंबित करत असल्याचे आदेशच देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

याबाबत पाठविलेल्या ई-मेलमध्ये अनिल गिल यांनी नमूद केले आहे की, रेडबर्ड या ॲकेडमीचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. तांत्रिक दोषासह इतर देखभाल दुरुस्ती यामुळे हे अपघात घडले आहेत. डीजीसीए आपल्या संस्थेच्या देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी करणार आहे. या शिवाय (डेझिग्नेटेड एक्झामिनर) प्रशिक्षकांची क्षमता व त्यांचे अधिकार तपासले जाणार आहे. या सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे डीजीसीएकडून या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बारामतीत अवघ्या तीनच दिवसात रेड बर्ड या विमान प्रशिक्षण कंपनीच्या दोन विमानांचे अपघात झाल्यानंतर डीजीसीएकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली. या अपघातात तीन जण जखमी झाले होते, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. विशेष म्हणजे रेल्वे मार्गाच्या अगदी जवळ हे अपघात झाले होते. त्यामुळे परिसरातील गावातील ग्रामस्थांसह औद्योगिक वसाहतीचा परिसर भितीच्या छायेखाली होता. आकाशात विमान उडू लागले की भीतीचा गोळा पोटात येत होता. त्यामुळे आता संपूर्ण तपासणी करुनच डीजीसीए डून पुढील कामकाजाबाबत रेडबर्डला निर्देश दिले जाणार आहेत.

कंपनी ढीम्मच !

बारामतीत तीन दिवसाच्या अंतरात दोनदा विमान कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. या अपघातानंतर कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. माध्यमांनी संपर्क साधल्यावर टाळाटाळ केली गेली. गुरुवारी (दि. १९) अपघातग्रस्त विमान झाकून ठेवले गेले. तर रविवारी (दि. २२) विमान मोकळ्या जागेत कोसळले. बारामतीत ॲकेडमी चालविणारी ही संस्था अपघाताबाबत फारशी गंभीर नसल्याचे दिसून आले.

Back to top button