पवार कुटुंबात सर्व आलबेल ? दोन्ही पवार एकाच मंचावर येऊनही संवाद नाही | पुढारी

पवार कुटुंबात सर्व आलबेल ? दोन्ही पवार एकाच मंचावर येऊनही संवाद नाही

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे रविवारी (दि. 22) भिगवणजवळ उभारण्यात आलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल वास्तू उद्घाटन प्रसंगी एका व्यासपीठावर आले. मात्र, या तिघांनी कोणतेही राजकीय भाष्य करणे टाळले. विशेष म्हणजे, शरद पवार व अजित पवार दोघे शेजारी न बसता त्या दोघांमध्ये प्रतिभाताई पवार व आशाताई पवार बसल्या होत्या. या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, राजकीय भाष्य टाळल्याने सत्ताधारी, विरोधक व उपस्थितांचा हिरमोड झाला. त्यातही शरद पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाला पहिली पसंती, त्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नावाला पसंती दिल्याने उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. तिघांनीही आपल्या भाषणात पवार कुटुंबाच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला आणि आदरही केला.

भिगवणजवळील स्वामी चिंचोली हद्दीत विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्घाटन रविवारी झाले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, अशोक पवार, श्रीनिवास पवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. सुळेंचा भाजपला चिमटा
खा. सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाच्या कामाचे गुणगान गायलेच; शिवाय भाजपला चिमटा काढला. त्या म्हणाल्या, भाजपातील मित्र सांगत होते, 4 दिवस कर्नाटकात प्रचार केला, त्याची व्हिजिबिलिटी काहीच नव्हती. पण, पवार कुटुंबाची काश्मीर टू कन्याकुमारी व्हिजिबिलिटी होती. त्यामुळे या कुटुंबात काहीतरी गंमत असेलच ना! कर्नाटक इलेक्शन चालले होते आणि पवारांच्या घरात एक गोष्ट चालली होती, तेव्हा 4 दिवस पंतप्रधानांचा दौरा चॅनलने दाखवला नाही. पण, आमच्या घरात जे चालले होते ते दिसत होते. चव्हाण सेंटर जास्त दिसत होते. या स्टोरी मला भाजपच्या मित्रांनीच सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

Back to top button