भाजपमध्ये खिंडार ! प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा | पुढारी

भाजपमध्ये खिंडार ! प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी रविवारी (दि. 22) प्रवक्ते पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपमध्ये स्थानिक पातळीवर खिंडार पडले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण हा राजीनामा देत असल्याची भूमिका पवार यांनी घेतली आहे. दसर्‍यानंतर 27 तारखेला ते त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे.

पवार हे भाजपमधून बाहेर पडून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ते लवकरच मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधतील, असेही बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर, रविवारी (दि. 22) एकनाथ पवार यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व आणि प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला हातभार लावण्यासाठी आपण हा राजीनामा देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही मराठा समाजाचे नेते मराठा आरक्षणाबाबत केवळ तमाशा बघत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र त्याचे खापर फुटत आहे. फडणवीस यांनी मिळवुन दिलेले आरक्षण या सरकारला टिकविता आले नाही.

मराठा आरक्षणाबाबत वेगळी भूमिका मांडणार्या नारायण राणे आणि रामदास कदम या नेत्यांनी एकदा मराठवाड्यात जाऊन मराठा समाजाच्या कौटुंबिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. काही जणांची अशी परिस्थिती आहे की त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सरकारने दोन दिवसांत मराठा आरक्षण जाहीर करावे. अन्यथा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आक्रमकपणे उतरणार आहे.

‘वेट अ‍ॅण्ड वॉच’
एकनाथ पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता पवार म्हणाले की, मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही. भाजप सोडणार का, याबाबतची भूमिका पुढील दोन दिवसांत स्पष्ट करेन.

हेही वाचा

Nashik News : त्र्यंबक परिसरात 35 परदेशी विद्यार्थ्यांची तपासणी

आज घरोघरी खंडेनवमीनिमित्त पूजा ; यंत्रे-उपकरणे, वाहनांचे पूजन

शरद पवार सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवतील : हिमंत सरमांचा पलटवार

Back to top button