अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले, आज सप्तश्रृंगी चरणी | पुढारी

अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले, आज सप्तश्रृंगी चरणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी निवडणुका लक्षात घेता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले असून, चिरंजीव तथा मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांच्यावर नाशिकचे जबाबदारी सोपविल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले आहेत. नुकतेच गणेशोत्सवात त्यांनी विविध मंडळांना भेटी देत गणरायाचा आशीर्वाद घेतला होता. आता ते सप्तश्रृंगी देवीच्या चरणी माथा टेकविण्यासाठी सोमवारी (दि.२३) नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी ते विविध नवरात्रोत्सव मंडळांनाही भेटी देणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून, आपल्या नऊ उमेदवारांची अधिकृत घोषणाही केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातही मनसे आपला उमेदवार देणार असून, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नावाची चर्चा आहे. अशात अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नाशिकने मनसेला कधीकाळी वैभव मिळवून दिले आहे. मात्र, नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, मनसेला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर सोपविल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी अमित ठाकरे नाशिकचे सतत दौरे करून पक्षसंघटनेसह स्थानिक राजकारणाची माहिती जाणून घेत आहेत. जेव्हा मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे टोलनाका फोडला होता तेव्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खास अभिनंदन करण्यासाठी ते नाशिकला आले होते. त्यांचा हा दौरा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये हुरूप निर्माण करणारा ठरला होता.

दरम्यान, सोमवारी (दि.२३) ते सकाळी ११.३० वाजता वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर रात्री माजी नगरसेवक सलीम शेख आणि माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देणार आहेत. गणेशोत्सवात त्यांनी शहरातील १५ पेक्षा अधिक, तर सिन्नर तालुक्यातील १९ पेक्षा अधिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले होते.

मनविसे प्रमुख अमित ठाकरे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी नाशिकला येत आहेत. या दौऱ्यात देवी दर्शन आणि दोन नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देण्याचेच नियोजन ठरले आहे.
– दिलीप दातीर, माजी शहराध्यक्ष, मनसे

राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे लक्ष
तीन आमदार, महापालिकेची सत्ता मिळूनदेखील स्थानिक नेत्यांमधील विसंवादामुळे आणि मार्केटिंगअभावी मनसेला आपला गड राखता आला नाही. मनसेकडून भाजपकडे गेलेला हा गड परत मिळवण्यासाठी ठाकरे पिता-पुत्रांनी शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे. अमित ठाकरे यांच्या सततच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे हेदेखील लवकरच नाशिकच्या दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा :

Back to top button