कराड: पोलीस गाडीने चौघांना उडवले; एक युवक जागीच ठार, एकजण गंभीर जखमी | पुढारी

कराड: पोलीस गाडीने चौघांना उडवले; एक युवक जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

ढेबेवाडी : पुढारी वृत्तसेवा दारूच्या नशेत बेधुंद होऊन भरधाव वेगाने ढेबेवाडीकडे निघालेल्या ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या गाडीवरील चालकांने (रविवार) रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान कुसूर (ता. कराड) येथे चौघांना उडविले. त्यात एकजण जागीच ठार झाला. या अपघातातत एकजण गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुसूर येथे रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान रयत सह.साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी नंदुरबार वरुन ट्रकमधून आणलेल्या कामगार टोळीचे साहित्‍य उतरण्याचे काम कुसूर बसस्थानकानजीक काम सुरू होते. तेंव्हा तिथेच मोटार सायकलवर सुजय उत्तम कांबळे बसलेला होता.

त्याचवेळी कराडकडून भरधाव वेगाने आलेल्या पोलीसगाडीने मोटरसायकलला वेगात धडक दिली. तेंव्हा गाडीवर बसलेला सुजय उत्तम कांबळे (वय 18) हा गाडीवरून उडून पुढे 7 ते 8 फुट लांब फेकला गेल्याने तो जागीच ठार झाला. तर शेजारी उभे असलेले युवराज अमरसिंग पावरा (वय 28), अजित यमगर (वय 39), विक्रम भिसे (वय 30) यांना गाडीची धडक बसली. त्यात युवराज पावरा याचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

सदर पोलीस गाडी ढेबेवाडी पोलीस ठाण्याची आहे. अपघात झाला तेंव्हा चालक म्हणून शंकर उत्तम खेतमर हे होते. अपघात झाला तेंव्हा नेमके काय घडले याची खबरबात त्यांना नव्हती, इतका चालक नशेत तर्र होता. अपघातानंतर त्याला गाडीतून बाहेर येता आले नाही. स्टेअरिंगवर डोके ठेवून तो बसला होता.

घटनेची माहिती कुसूरचे पोलीस पाटील प्रकाश शिणगारे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात कळविली. तेंव्हा पोलीस निरीक्षक विजय पाटील, हवालदार हजारे व संकपाळ हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या कॉटेज हॉस्पिटलला पाठविली‌. जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला पाठविले. जखमींवर उपचार करून सोडण्यात आले.
अपघातात दुचाकीचे व पोलीस गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. चालक शंकर खेतमर दारू पिऊन गाडी चालवित होता, हे पोलिसांसमोरच स्पष्ट झाले. रात्री उशिरा पर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत सुजल कांबळे हा कुसूरच्या स.गा.म.विद्यालयात इ.12 वीत शिकत होता.

हेही वाचा

Back to top button