शरद पवार सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवतील : हिमंत सरमांचा पलटवार | पुढारी

शरद पवार सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवतील : हिमंत सरमांचा पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्राईल-पॅलेस्टाईन समर्थन यावरुन देशात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्राईल समर्थनात घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी टीका केली हाेती. या टीकेवर भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पलटवार केला आहे.

शरद पवार काय म्हणाले होते ?

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात (Israel-Hamas War) पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली. पॅलेस्टाईनला मदत करण्याच्या भूमिकेत बदल झाला नव्हता. आता मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वच्छ भूमिका ही पॅलेस्टाईनच्या समर्थनाची असल्याचे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची बाजू घेणे दुर्दैवी असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते.

हिमंता बिस्वा सरमांचा शरद पवारांवर पलटवार

शरद पवारांच्‍या विधानावर बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्‍हणाले की, “मला वाटते शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना हमास या दहशतवादी संघटनेसाेबत लढण्यासाठी गाझाला पाठवतील.”

यावेळी त्‍यांनी पाच राज्‍यातील विधानसभा निवडणुकीवरही भाष्‍य केले. ते म्‍हणाले, मी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेलो आहे. भाजपचे कार्यकर्ते जमिनीवर चांगले काम करत आहेत. आम्ही सहज जिंकू. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे कोणतीही पात्रता नाही. ते केवळ घराणेशाहीमुळे राजकारणात आहेत, अशी टीकाही त्‍यांनी केली.

नितीन गडकरींनीही केला पवारांच्‍या वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इस्रायल-हमास युद्धावरील वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे ते बुधवारी म्हणाले. गडकरी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शरद पवार यांनी दिलेल्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र निषेध करतो, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पष्ट निषेधावर प्रश्न उपस्थित केले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत नेहमीच सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला ठाम पवित्रा आणि निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी आमची अटूट बांधिलकी दर्शवते. देशाचे हित आणि राष्ट्रीय सुरक्षेवर कधीही राजकीय विचारांचा प्रभाव पडू नये, हे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने समजून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा सर्वांत चिंतेचा विषय असून त्यात एकता आणि एकमत असणे आवश्यक आहे.”

दहशतवादाशी संबंधित मुद्द्यांवर ज्येष्ठ नेते निष्काळजीपणा बाळगतात. शरद पवार यांच्‍यासारखे ज्येष्ठ नेते इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर ‘अर्थहीन’ विधाने करतात तेव्हा हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button