आज घरोघरी खंडेनवमीनिमित्त पूजा ; यंत्रे-उपकरणे, वाहनांचे पूजन | पुढारी

आज घरोघरी खंडेनवमीनिमित्त पूजा ; यंत्रे-उपकरणे, वाहनांचे पूजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच नवरात्रोत्थापनाचा दिवस सोमवारी (दि. 23) असून, आज
नवरात्रोत्थापन, महानवमी उपवास, खंडेनवमी आणि आयुधनवमी आहे. त्यानिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आज खंडेनवमीही असल्याने घरोघरी शस्त्रास्त्रे, यंत्रे-उपकरणांचे पूजन केले जाणार असून, तर उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने घरोघरी देवीची विधिवत पूजाअर्चा केली जाणार आहे. नवरात्र उत्सवाचा शेवटच्या दिवशी भाविकांना मंदिरात दिवसभर देवीचे दर्शन घेता येणार आहे.

यानिमित्ताने मंदिरांमध्ये महिला भजन मंडळांचे भजनाचे कार्यक्रम आणि भक्तिगीतांचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. तर फुलांची आकर्षक सजवाट आणि विद्युतरोषणाईने मंदिर परिसराला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. मंदिरांसह घराघरांमध्येही विविध धार्मकि कार्यक्रम आयोजित केले आहेत. घरोघरी पारंपरिक वेशभूषेत महिला – युवती देवीचे पूजन करणार आहेत. तर खंडेनवमीनिमित्त शस्त्रास्त्रे, उपकरणे, वह्या-पुस्तके, वाहने आदींचे पूजन घरोघरी होणार आहे. यानिमित्ताने पंचपक्वानांचा बेत आखला जाणार आहे. तर महिला-युवती महानवमीचा उपवासही करणार आहेत. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंडळांच्या ठिकाणीही वैविध्यपूर्ण कार्यक्रम होतील. दांडिया – गरबाच्या कार्यक्रमांसह महिलांसाठीच्या स्पर्धा आणि महिलांच्या हस्ते आरतीचे आयोजन केले आहे.

सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात. मात्र, या वेळेस दसर्‍याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे.
घटस्थापनेपासून दसर्‍यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. पण, यावर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी नवरात्रोत्थापन असून, दसरा दहाव्या दिवशी आहे, असे दाते पंचागाचे मोहन दाते यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button