Dasara Special : सराफा बाजारात होणार कोट्यावधींची उलाढाल | पुढारी

Dasara Special : सराफा बाजारात होणार कोट्यावधींची उलाढाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  इस्राईल-हमास युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चिततेची स्थिती, अस्थिर शेअर बाजार, रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आदींमुळे सोने हेच सुरक्षित आणि भरवशाचे गुंतवणुकीचे माध्यम असल्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यास पुणेकर प्राधान्य देण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने शहरातील सोन्याच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांची आगाऊ नोंदणीही झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के अधिक विक्री होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

बाजारात नवनवीन डिझाइनचे दागिने उपलब्ध असून, प्रामुख्याने मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी यांसह कमी वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांची मागणी आहे. अनकट डायमंडसह प्लॅटिनमच्या दागिन्यांची मागणीही वाढल्याचे चित्र आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीच्या अनुषंगाने आपटा पान, सोन्याचे बार, नाणी, तर लग्नसराईच्या अनुषंगाने दागिन्यांची नोंदणी करण्याकडे कल आहे.
सद्य:स्थितीत तरुण जोडप्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांकडून खरेदी करण्यात येते. सणापूर्वी ग्राहकांकडून सोन्याची नोंदणी केली जाते. त्यानंतर शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. त्याअनुषंगाने दागिन्यांच्या मजुरीवर आकर्षक सूट जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

दसरा सणाचा मुहूर्त साधण्यासाठी व्यापार्‍यांची गेल्या काही दिवसांपासून जोमाने तयारी सुरू होती. त्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची होत असलेल्या गर्दीमुळे व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण असून, सराफा बाजारातही चैतन्य निर्माण झाले आहे.

सोन्या-चांदीची आपट्याची पाने, नाणी, सोन्याच्या वेढणीला मागणी आहे. आकर्षक डिझाइन बाजारात आहेत. सोन्यासह चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलत देण्यात आली आहेत. अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असल्याने त्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
                                            – दत्तात्रय देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स.

 दसर्‍याला रेकॉर्ड ब्रेक विक्री होण्याचा
अंदाज आहे. लोकांनी आगाऊ बुकिंग केली आहे. दागिने खरेदीला प्राधान्य आहे. 70 टक्के नागरिकांकडून दागिन्यांची खरेदी करण्यात येत आहे. उर्वरित 30 टक्के नागरिकांकडून चोख सोने खरेदी करण्यात येत आहे. जागतिक अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या बाजारावर झाला आहे. सोन्याला
मागणी वाढली आहे.
                                                         – जित मेहता, संचालक, पुष्पम ज्वेलर्स

Back to top button