शिक्षकांना असाक्षरांचे सर्वेक्षण करावेच लागणार ! नाहीतर कारवाईचा बडगा | पुढारी

शिक्षकांना असाक्षरांचे सर्वेक्षण करावेच लागणार ! नाहीतर कारवाईचा बडगा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना आता असाक्षरांच्या सर्वेक्षणाचे काम करावेच लागणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने 28 ऑक्टोबर ही सुधारित कालमर्यादा जाहीर केली असून, उद्दिष्टानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत ‘उल्लास’ अ‍ॅपवर असाक्षर आणि स्वयंसेवकांची ऑनलाइन जोडणी (टॅगिंग) करायची आहे. कामात हयगय करणार्‍या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

संबंधित बातम्या :

निरक्षरता ही देशापुढील एक प्रमुख सामाजिक व शैक्षणिक समस्या असून ,या योजनेच्या कामाला अशैक्षणिक ठरवत बहिष्कार घालून शिक्षक संघटनांनी प्रारंभीच खोडा घातल्याने योजनेचे काम मंदावले. राज्यात ऑफलाइन सर्वेक्षणाचे व काही प्रमाणात प्रशिक्षणाचेही कामकाज संघटनांनी बंद पाडल्याचे निदर्शनास आले. नव भारत साक्षरता योजनेच्या सद्य:स्थिती व अंमलबजावणीबाबत विद्या प्राधिकरणात नुकतीच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची चर्चा झाली. यामध्ये ऑनलाइन नोंदणी व टॅगिंग, प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन, जिल्हास्तरीय बैठका यांसह योजनेच्या कोणत्याही टप्प्यावरील कामात कुचराई करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून दखल
चिंचणी (जि. सातारा) येथील 76 वर्षीय बबई मस्कर या महिलेच्या साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाच्या छायाचित्राची आणि बारामती (जि. पुणे) येथील 72 वर्षीय सुशीला या आजी व 9 वर्षीय रुचिता क्षीरसागर या त्यांच्या नातीच्या प्रेरणादायी छायाचित्रांची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे. राज्यानेही नव भारत साक्षरता अभियानात त्यांचा प्रचारासाठी वापर सुरू केल्याचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

कामात हयगय, दिरंगाई, कुचराई करणार्‍या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर प्रकरणपरत्वे म.ना.से, जि. प. अधिनियम व नियमावली, एमईपीएस अधिनियम व नियमावली, माध्यमिक शाळा संहिता यापैकी लागू असलेल्या तरतुदींनुसार नियंत्रण अधिकार्‍यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
                                                  -डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

Back to top button