मोदींकडून महिलाशक्तीला कायम प्राधान्य : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

मोदींकडून महिलाशक्तीला कायम प्राधान्य : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम महिलाशक्तीला प्राधान्य दिले आहे. देशाचे राष्ट्रपतीपद आदिवासी महिलेला देऊन जगासमोर नवा आदर्श घालून दिला. देशाच्या अर्थकारणाची चावीही निर्मला सीतारामन यांच्याकडे दिली. ते महिला समाजाला पुढे नेण्याचे काम करत आहेत, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे ’नवदुर्गा’ पुरस्कारांचे वितरण बावनकुळे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी चित्रा वाघ, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सिंबायोसिस विद्यापीठाच्या डॉ. विद्या येरवडेकर, धारिवाल फाउंडेशनच्या जान्हवी धारिवाल, अभिनेत्री प्रिया बेर्डे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भाग्यश्री पाटील, डॉ. आदिती कराड, ऋतुजा सोमण, चाहत दलाल, दीपा परब, रश्मी कांबळे, उर्मिला निंबाळकर, पूजा आनंद, शीतल पवार, श्वेता शालिनी, शीतल महाजन, चाहत दलाल आदी कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी उषा वाजपेयी, संगीता तिवारी उपस्थित होत्या.

वाघ म्हणाल्या, ’महिलांचे जगणे पुरुषांइतके सोपे नसते. महिला घराची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळतात. त्यामुळे प्रत्येक दुर्गा आदरास पात्र आहे.’ माजी आमदार जगदीश मुळीक आणि अर्चना पाटील यांनी प्रास्ताविक केले. निवेदिता एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. बॉबी करनानी यांनी आभार मानले.

बावनकुळे यांचा मुळीक यांना टोला

जगदीश मुळीक यांच्यासारखा प्रभावी नेता विधिमंडळात असायला हवा. त्यांनी वडगाव शेरीकडे लक्ष द्यावे. पुढील सर्व कार्यक्रम वडगाव शेरीमध्ये घ्यावेत. आता महायुती असली तरी मुळीक यांच्याकडे वडगाव शेरीचे नेतृत्व देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळीक यांना आमदारकीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘मुळीक यांनी खासदार व्हावे’ अशा घोषणा दिल्या. या वेळी खासदार पदाबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा

विकासकामांना सहकार्य करा : अजित पवार

अबब! जुई, चमेलीला 1400 रुपयांचा भाव

लोकप्रतिनिधी मानहानीच्या दाव्याच्या कचाट्यात

 

Back to top button