अबब! जुई, चमेलीला 1400 रुपयांचा भाव | पुढारी

अबब! जुई, चमेलीला 1400 रुपयांचा भाव

 

पुणे : शारदीय नवरात्रोत्सवात देवीला वाहण्यासह केसांमध्ये माळण्यासाठी महिलावर्गाकडून गजरा व वेणीची प्राधान्याने खरेदी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फुलबाजारात गजर्‍यासाठी जुई, चमेली, कागडा; तर वेणीसाठी शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी होत आहे. यामध्ये जुई व चमेली चांगलाच भाव खात असून, मागणीपेक्षा आवक कमी असल्याने बाजारात या फुलांचे प्रतिकिलोचे भाव तब्बल 1 हजार 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारात म्हातोबाची आळंदी, कुंजीरवाडी भागातून जुईची, तर तळेगाव ढमढेरे परिसरातून चमेलीची आवक होत आहे. शनिवारी चमेलीची 11 किलो, तर जुईची 80 किलोंची आवक झाली. याखेरीज, कर्नाटकातील हावेरी, सिरा, तसेच स्थानिक भागातून कागड्याची आवक होत आहे. यामध्ये सर्वाधिक आवक ही कर्नाटकातून होत आहे. पुड्या व लड स्वरूपात कागडा बाजारात दाखल होत आहे. त्याच्या प्रतिकिलोची 200 ते 400 रुपये भावाने विक्री होत आहे.

यवत, माळशिरज, वाई, सातारा, तसेच नगर भागातील सुपा, पारनेरमधून शेवंती बाजारात विक्रीसाठी येत आहे. वेणीसाठी शेवंतीच्या फुलांना मागणी असून, त्याच्या प्रतिकिलोस प्रतवारीनुसार 60 ते 120 रुपये भाव मिळत आहे. नवरात्रोत्सवास सुरुवात झाल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या महिलावर्गाकडून पूजेसह गजरा, तसेच वेणीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे, शहरातील गजरे, तसेच फूल विक्रेत्यांकडून जुई, चमेलीच्या फुलांना मागणी वाढली आहे. यंदा नवरात्रामध्ये जुई व चमेलीच्या फुलांना समाधानकारक भाव मिळत असल्याने फूल उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे फुलबाजार विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी सांगितले.

सुवासिक फुलांना मागणी

महिलावर्गाकडून सुवासिक असलेल्या जुई आणि चमेलीच्या फुलांच्या गजर्‍याला सर्वाधिक पसंती मिळते. त्यापाठोपाठ कागड्याच्या गजर्‍याच्या खरेदीस प्राधान्य देण्यात येत आहे. जुई आणि चमेलीच्या फुलांना सुगंध असतो, तर कागड्याला सुगंध नसतो. जुईची फुले ही दोन दिवस टिकतात, तर चमेली अवघी एक दिवस टिकते. चमेलीस जुईपेक्षा जास्त वास असतो.

नवरात्रास सुरुवात झाल्यानंतर बाजारात झेंडू, शेवंतीसह गजर्‍यासाठी लागणार्‍या जुई, चमेलीच्या फुलांना चांगली मागणी आहे. जुई, चमेलीच्या मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने त्यांना दरही चांगला मिळत आहे.
– सागर भोसले, समन्वयक,
फुलबाजार अडते असोसिएशन.

Back to top button