Ajit Pawar : अजित पवारांच्या बैठकीला माजी नगरसेवकांची हजेरी | पुढारी

Ajit Pawar : अजित पवारांच्या बैठकीला माजी नगरसेवकांची हजेरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील व समाविष्ट गावांमधील रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या 42 पैकी 31 माजी नगरसेवकांनी हजेरी लावली. उर्वरित 11 जणांपैकी शरद पवार गटाच्या 8 माजी नगरसेवकांनी मात्र बैठकीकडेे पाठ फिरवली. दरम्यान, एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला असून, आणखी दोघे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी करून सत्तेत सहभाग घेतला आहे. त्यांच्या समवेत नऊ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. तर चाळीसपेक्षा अधिक आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या बंडानंतर भूमिका स्पष्ट करत काहींनी शरद पवार यांच्या, तर काहींनी अजित पवार यांच्या मागे उभे राहण्याचे जाहीर केले.

मात्र, बहुसंख्य माजी नगरसेवकांनी पुढे अडचण होऊ नये म्हणून स्पष्ट भूमिका न घेता कुंपणावर राहणे पसंत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहर व समाविष्ट गावातील विकासकामांसदर्भात शनिवारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेतली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना बोलावण्यात आले होते.

विसर्जित झालेल्या सभागृहातील बहुसंख्य नगरसेवकांनी आजवर भूमिका स्पष्ट न करण्याचा पर्याय अवलंबला होता. त्यामुळे या बैठकीला किती माजी नगरसेवक उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीला महापालिकेच्या 31 माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावली. आपल्या भागातील अडचणी, प्रश्न व रखडलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. यावर अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित झालेले प्रश्न व विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या. यावरून शहरातील राष्ट्रवादीवर अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

A solar mystery : सूर्याच्या कोरोनाचे तापमान अधिक का?

Pune News : बारामतीत पुन्हा विमान कोसळळे

राज्‍यरंग : शिवाजी पार्क राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार

Back to top button