पिंपरीतील जलतरण तलावावर सुरक्षा साधने | पुढारी

पिंपरीतील जलतरण तलावावर सुरक्षा साधने

दीपेश सुराणा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती होण्याचा प्रकार घडल्यानंतर तलावांवर पोहण्यास येणार्‍या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, जलतरण तलावांमध्ये क्लोरीन गॅसऐवजी क्लोरीन पावडरचा वापर करून पाणी शुद्ध केले जात आहे.

महापालिकेच्या कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती होण्याचा प्रकार 10 ऑक्टोंबरला घडला होता. त्या वेळी 19 जणांना बाधा झाली होती. या पार्श्वभूमीवर जलतरण तलावांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाकडून काय व्यवस्था करण्यात आली आहे, याची दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने गुरुवारी (दि. 19) प्रत्यक्ष पाहणी केली.

या भेटीदरम्यान महापालिकेच्या पिंपरी वाघेरे येथील जलतरण तलावावर सुरक्षेची पुरेशी साधने पाहण्यास मिळाली. येथे पोहण्यास येणार्‍या 16 व्यक्तींमध्ये एक याप्रमाणे जीवरक्षक नियुक्त केलेले आहेत. एकावेळी 80 जण पोहू शकतील, इतकी या जलतरण तलावाची
क्षमता आहे.

क्लोरीनचा प्रमाणात वापर

पिंपरीतील जलतरण तलावामध्ये अंदाजे 8 ते 10 लाख लिटर इतके पाणी सोडलेले आहे. येथील पाणी शुद्ध राहावे आणि पाण्यातील गढुळपणा कमी व्हावा यासाठी निश्चित प्रमाणात क्लोरीन पावडरचा वापर केला जात आहे. क्लोरीनपासून संरक्षणासाठी नागरिकांनी पोहताना डोक्यात टोपी घालणे, डोळ्यांना पाण्यात वापरण्याचा गॉगल लावणे गरजेचे आहे, अशी माहिती येथील व्यवस्थापकाने दिली.

जलतरण तलावावरील सुरक्षा

जलतरण तलावावर सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याची चाचणी करण्यात आली आहे. येथील पाण्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने हा जलतरण तलाव खुला करण्यात आला आहे. येथे सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट, लाइव्ह गार्ड रिंग, सेफ्टी रोप, बांबु आदी सुरक्षाविषयक साधने ठेवण्यात आलेली आहेत. येथे पोहण्यासाठी येणार्या लहान मुलांना 3 फुट अंतर खोली असलेल्या ठिकाणीच पोहण्याच्या सूचना दिलेल्या आहे. ज्यांना व्यवस्थित पोहता येते अशा नागरिकांना 7 फुट खोलीपर्यंत पोहण्याची मुभा दिलेली आहे.

हेही वाचा

Pune News : बेट भागातील फ्युज पेट्या धोकादायक

Rajasthan Poll: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ८३ उमेदवारांची यादी जाहीर

Pune news : पारगाव ग्रा.पं.साठी सत्त्याहत्तर अर्ज दाखल

Back to top button