Pune News : बेट भागातील फ्युज पेट्या धोकादायक

Pune News : बेट भागातील फ्युज पेट्या धोकादायक

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  शिरूरच्या बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द आदि गावातील शेतशिवारात असलेल्या अनेक रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारांमध्ये पडलेले झोळ, उघड्या स्वरूपातील फ्युज पेट्या आणि वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिक, लहान मुले, जनावरे यांचे जीवितास धोका निर्माण झाला आहे; मात्र महावितरणकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तारांमध्ये पडलेल्या झोळामुळे उसाच्या शेताला आग लागून शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत.

पावसाळ्याच्या दिवसांत उघड्यावरील फ्युज पेट्या, वाकलेले लोखंडी खांब यामुळे कोणताही अनर्थ घडल्यास एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अचानकपणे विजेच्या संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास अनेकदा शेतकर्‍यांना स्व:खर्चाने या दुरुस्त्या कराव्या लागतात. अशा वेळी जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत अनेकदा शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या आहेत. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती न करता महावितरणकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. महावितरणने गावोगावी जाऊन अशाप्रकारे दुरवस्था झालेल्या फ्युज पेट्यांसह, जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि खांब यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तांत्रिक साहित्याची दुरवस्था
मागील अनेक वर्षांपूर्वी या भागात उभारण्यात आलेले विजेचे खांब व वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. विद्युत रोहित्राचे फ्युज, केबल यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. यावर गंज चढला असून, या ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन वारंवार केबल जळण्याचे प्रकार सुरू आहेत. पावसाळ्यात त्यावर पाणी पडून विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news