सर्वात महागडा दुर्गा मंडप, गिनिज बुकमध्ये नोंद | पुढारी

सर्वात महागडा दुर्गा मंडप, गिनिज बुकमध्ये नोंद

कोलकाता : देशात आणि विदेशातही नवरात्री आणि दुर्गापूजेचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवाचे भव्य मंडप, देखावे व आरास पाहायला मिळते तशीच दुर्गापूजेचेही मंडप देशभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. दुर्गापूजेचे सर्वात भव्य स्वरूप प. बंगालमध्ये पाहायला मिळते. मात्र, आता जगातील सर्वात महागडा दुर्गा पंडाल म्हणजेच मंडप प. बंगालमध्ये नव्हे तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरात पाहायला मिळत आहे. वृंदावनातील प्रसिद्ध प्रेम मंदिराची प्रतिकृती याठिकाणी बनवण्यात आली असून या दुर्गा पंडालची आता गिनिज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे.

लखनौच्या जानकीपूरममध्ये हा दुर्गा पंडाल आहे. विशेष म्हणजे या पंडालचे नाव पहिल्यांदाच गिनिज बुकमध्ये नोंदवले आहे असे नाही, तर 2019 नंतर सातत्याने या पंडालची गिनिज बुकमध्ये नोंद होत आली आहे. सर्वात उंच व भव्य असा हा पंडाल असतो. पंडालचे संचालक सौरव बंदोपाध्याय यांनी सांगितले की हा दुर्गापंडाल एकूण 47,210 चौरस फूट जागेत बनवला आहे. हा पंडाल बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. त्यासाठी 55 लाख रुपये खर्च करण्यात आले.

वृंदावनातील प्रेममंदिराची हुबेहूब प्रतिकृती याठिकाणी बनवण्यात आली आहे. थर्माकोलला संगमरवरासारखे दर्शवण्यात आले आहे. त्यासाठी 650 लिटर पेंटचा वापर करण्यात आला. केवळ बाहेरूनच नव्हे तर पंडालचा अंतर्गत भागही प्रेममंदिराच्या अंतर्गत भागासारखा बनवला आहे. याठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे मोहक दर्शन घडते. पंडालमध्ये दुर्गादेवीची सुंदर मूर्ती आहे. हा पंडाल गुरुवारपासून लोकांसाठी खुला करण्यात आला.

Back to top button