काळजीची बातमी ! ’ऑक्टोबर हिट’ने ओलावा घटला ; रब्बी हंगामातील पेरा घटणार | पुढारी

काळजीची बातमी ! ’ऑक्टोबर हिट’ने ओलावा घटला ; रब्बी हंगामातील पेरा घटणार

समीर भुजबळ

वाल्हे : या वर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सूनचा पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तालुक्यात सर्वत्रच पाणीटंचाई निर्माण होत आहे. ऑक्टोबर महिन्यात उष्णतेत प्रचंड वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होऊ लागल्याने तालुक्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे. एखादा अवकाळी पाऊस जर झाला नाही, तर रब्बी पिकांच्या पेरणीसोबतच पुरंदर तालुक्यातील फळबागांवर संकटाची कुर्‍हाड पुन्हा एकदा कोसळणार आहे. शेतातील उभी पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. या वर्षी खरीप हंगामातील पिके पाण्याच्या संकटामुळे हातातून गेली आहेत. रब्बी हंगामाची भिस्त आता अवकाळी पावसावर अवलंबून आहे. पुढील काही दिवसांत अवकाळीच्या सरी पडल्या नाहीत तर या वर्षी पुरंदर तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.  ‘ऑक्टोबर हिट’चा चटका वाढल्याने तालुक्यात उन्हाची ताप वाढल्याने खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत.

जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी, तालुक्यातील रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत. पुरंदर तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात पाऊस वेळेवर न पडल्याने हंगाम लांबला. कोरडवाहू पेरणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जलसाठ्यांची दयनीय अवस्था झाली असून, विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यात कमी पाण्यात येणार्‍या रब्बी ज्वारीचा पेरा करण्याशिवाय पर्याय नसून, हे पीकदेखील कितपत हाती लागते याविषयी शंका आहे.

हेही वाचा :

Back to top button