Pune Crime News : अखेर जुगार अड्ड्याच्या लुटीचे गुन्हे दाखल! | पुढारी

Pune Crime News : अखेर जुगार अड्ड्याच्या लुटीचे गुन्हे दाखल!

पुणे : फरासखाना आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून जुगार अड्डे लुटल्याप्रकरणी पोलिसांनी आता गुन्हे दाखल केले आहेत. तर काही संशयितांना ताब्यातदेखील घेतले आहे. दै. ‘पुढारी’च्या वृत्तानंतर पोलिसांना जाग आल्याचे दिसून आले आहे. याबाबत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेला एक जुगार अड्डा चोरट्यांनी लुटला होता. रात्रीच्यावेळी मध्यवस्तीत ही घटना घडली होती. तीन शस्त्रधारी चोरट्यांनी पिस्तूल, तलवार घेऊन जुगार अड्डात प्रवेश केला होता. या वेळी जुगार खेळणार्‍या आणि घेणार्‍या व्यक्तींनी तेथून पळ काढल्यानंतर चोरटे रोकड लुटून पसार झाले होते. तर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतदेखील महापालिकेच्या समोर असलेला जुगार अड्डा अशाच प्रकारे शस्त्रधारी चोरट्यांनी लुटला होता. रात्रीच्या वेळी चौघा चोरट्यांनी पिस्तूल, कुर्‍हाड, आणि तलवारी घेऊन आत प्रवेश केला.

त्यानंतर तेथील दोघांना धाक दाखवून रोकड लुटली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी कामालीची गोपनीयता बाळगत या प्रकाराची कोठेही वाच्यता केली नाही किंवा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले तेव्हा हा प्रकार चव्हाट्यावर आला. दै. ’पुढारी’ने बुधवारी (दि. 18) वृत्तप्रसिद्ध केले होते. त्याच वृत्ताची दखल घेत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांना या दोन्ही प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकीपासून जवळच जुगार अड्डा कसा ? अड्डे कधी लुटले ? प्रकार का लपवून ठेवण्यात आला ? याची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल्ल यांनी दिली आहे.

पोलिसांची पंचाईत काय लपवू, कुठं लपवू?

जुगार अड्डे शस्त्रधारी चोरट्यांनी लुटल्यानंतर पोलिसांची मात्र ‘काय लपवू, कुठं लपवू’ अशी पंचाईत झाल्याचे दिसून आले. प्रश्न जुगार अड्ड्याचा असल्यामुळे पोलिसांनी ‘तेरी भी चुप अन् मेरी भी चुप’ अशीच भूमिका घेतली. मात्र सीसीटीव्ही व्हायरल झाल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला. यामुळे शिवाजीनगर आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोस जुगार अड्डे सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त याबाबत काय भूमिका घेणार हे मात्र पाहावे लागणार आहे.

हेही वाचा

स्वप्नवत प्रवासाला मिळणार चालना!

Israel-Hamas war : बायडेन यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल

धक्कादायक! पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या भोजनात झुरळ, अळ्या

Back to top button