Devendra Fadnavis : सहकारी बँकांचे मोठे योगदान : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : सहकारी बँकांचे मोठे योगदान : देवेंद्र फडणवीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी बँकांचे योगदान मोठे आहे. सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्त्वाचे असून, अशा भावनेतून काम करणारी संस्था मोठी होते, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
जनता सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा (75 वर्षे) शुभारंभ सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केला होता.

कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी महाराज, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष डॉ. अलका पेटकर, संचालक सी. ए. माधव माटे, प्रभाकर परांजपे, मकरंद अभ्यंकर, सीए किसन खाणेकर, किरण गांधी, मंदार लेले, अमित घैसास, मंदार फाटक, पद्मजा कुलकर्णी, श्रीरंग परस्पाटकी, मिलिंद लिमये, कानिफनाथ भगत, श्रीकांत पोतनीस, रघुराज बाहेती, प्रभाकर कांबळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप आदी उपस्थित होते.

बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच, बँकेची गृहपत्रिका गरुडझेप विशेषांकाचे प्रकाशन या वेळी झाले. फडणवीस म्हणाले, की भारताची प्रगती वेगाने होत असून, येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊ शकेल. यासाठी वित्तीय संस्थांची जबाबदारी वाढली आहे.

सहकार क्षेत्रात स्पर्धक जास्त आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी जनता सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवली. विश्वास आणि निस्वार्थ भावनेने काम करणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे. या विचारांवरच जनता बँकेची वाटचाल सुरू आहे. जनता बँक आणि सर्वसामान्य खातेदार यांचे संबंध आजही घट्ट आहेत. जनता सहकारी बँकेची वाटचाल ही इतर बँकांसाठी आदर्शवत आहे.

बँकांनी तरूणांना मदत करावी : पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, की सर्वसामान्य ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्याचे धाडस जनता बँकेसारख्या सहकारी बँकांनी दिले. सरकार काही मर्यादेपर्यंतच सरकारी नोकर्‍या निर्माण करू शकते, मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो नोकर्‍या आणि उद्योग निर्माण झाले. त्यामुळे बँकांनी यापुढील काळामध्ये तरुणांना आणि विशेष करून छोट्या उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी. भूषण स्वामी महाराज म्हणाले, की जनता सहकारी बँकेची वाटचाल ही रामदास स्वामींनी घालून दिलेले विचार आणि मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळेच ही बँक सर्वसामान्यांसाठी केवळ बँक नव्हे, तर एक विश्वासाचे दृढ नाते निर्माण झाले आहे. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश कश्यप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अलका पेटकर यांनी आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news