Vasantdada Bank : वसंतदादा बँक इमारतीची ओळख संपणार | पुढारी

Vasantdada Bank : वसंतदादा बँक इमारतीची ओळख संपणार

शिवाजी कांबळे

सांगली : वसंतदादा बँकेची मुख्य इमारत डेक्कन इन्फ्रा कंपनीला 10 कोटी 73 लाखाला विक्री करण्यात आली आहे. आता कंपनीने बँकेचा फलक हटवून इमारतीची डागडुजी सुरू केली आहे. बँकेची इमारत म्हणून असलेली ओळख संपण्याच्या मार्गावर आहे.
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मदन पाटील यांच्या प्रयत्नातून सांगली -मिरज रस्त्यावर भव्य व सुसज्ज अशी चार मजली इमारत बांधण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते 2001 मध्ये या इमारतीचे उद्घाटन झाले होते.

2019 मध्ये तत्कालीन अवसायक निळकंठ करे यांनी ही इमारत विकण्याबाबतची परवानगी सहकार विभागाकडून मागितली होती. त्यानंतर त्यांनी लिलाव प्रक्रिया राबवून डेक्कन इन्फ्रा कंपनीला 10 कोटी 73 लाखाला सदरची इमारत विक्री बाबतचा प्रस्ताव कायम केला. या लिलाव प्रक्रिया विरुद्ध ठेवीदार संघटना, अन्याय निर्मूलन समिती व अन्य संघटनांनी तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. ना. पाटील यांनी या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली होती.

2023 मध्ये अवसायाकपदी स्मृती पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर स्थगिती उठविण्यात आली व लिलाव कायम करण्यात आला. 2019 मध्ये सर्वाधिक बोली बोलल्याने डेक्कन कंपनीने 15 टक्के रक्कम म्हणजेच 1 कोटी 60 लाख 88 हजार 600 रुपये 30-12-2023 भरली होती. आता खरेदी पत्राच्या वेळेला 6 मार्च 2023 रोजी उर्वरित 9 कोटी 90 लाख 880 रुपये भरण्यात आले आहेत.

खरेदीपत्र झाल्याने डेक्कन इन्फ्रा कंपनीने इमारतीच्या दर्शनी बाजूस असलेली भिंती ऐवजी पत्रे मारले आहेत. इमारतीची डागडुजी करण्यात सुरू केली आहे. लवकरच बँकेचा कारभार येथून स्थलांतर होण्याची शक्यता आहे. या बँकेवर वसंतदादा यांचे असलेले नाव जाऊन डेक्कन इन्फ्रा कंपनीचे नाव दर्शनी बाजूस लागणार असल्याने बँकेची इमारत म्हणून या वास्तूला असलेली ओळख संपुष्टात येणार आहे.

इमारत विक्रीची चौकशी सुरू

या इमारतीच्या विक्री प्रक्रियेला तत्कालीन सहकार मंत्र्यांनी 2019 मध्ये स्थगिती दिली असताना आयुक्तांनी ती स्थगिती 2023 मध्ये कशी उठवली. या इमारतीच्या लिलाव प्रक्रियेसाठी सहकार आयुक्त यांच्याकडून अपसेट प्राईज मंजूर करून घेण्यात आली नव्हती. या वाणिज्य वापरासाठी असलेल्या इमारतीचे मूल्यांकन शासकीय दरापेक्षा कमी आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्याने याबाबत सहकार विभागाकडून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इमारतीची डागडुजी सुरू आहे.

Back to top button