Pimpri News : खातेनिहाय चौकशी सुरू, तरीही कर्मचारी ठरले ‘गुणवंत’ | पुढारी

Pimpri News : खातेनिहाय चौकशी सुरू, तरीही कर्मचारी ठरले ‘गुणवंत’

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रत्येक विभागाच्या एका गुणवंत कर्मचार्‍याचा गौरव करण्यात आला. मात्र, त्याचे निकर्ष ठरलेले नसल्याने खातेनिहाय चौकशी सुरू असलेले, आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका असलेले, आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई केलेल्या अशा काही कर्मचार्‍यांनाही गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात गुणवंत कर्मचार्‍यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आयुक्तांच्या हस्ते गौरव केला जातो. त्यासाठी प्रत्येक विभागाकडून एक नाव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विविध विभागांच्या 52 गुणवंत कर्मचार्‍यांचा गौरव चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.

गुणवंत कर्मचार्‍यांचे नाव देण्यासाठी महापालिकेची कोणतेही नियमावली नाही. त्यामुळे खातेनिहाय चौकशी सुरू असलेले, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असलेले, आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई केलेले, दोन ते तीन वर्षे सेवा झालेले, विभागप्रमुखांचा जवळचा असलेले अशा काही कर्मचार्‍यांना गुणवंत कर्मचारी म्हणून शिफारस करण्यात आली. त्यांना आयुक्तांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामुळे विविध विभागांतील प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

उत्कृष्ट काम केलेले, काही तरी नवीन केलेले, नवीन संकल्पना राबविलेले, महापालिकेच्या नावलौकीकात भर घालण्यासाठी कामगिरी करणारे, अधिक वर्षे सेवा केलेले अशा कर्मचार्यांना गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जावे, अशी सूचना नाराज कर्मचार्‍यांनी केली आहे. त्यासाठी नियमावली करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्यान विभागाच्या 21 कर्मचार्‍यांचा सन्मान

एका विभागाच्या एकाच कर्मचार्‍यांना गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. तशी 52 नावे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार उद्यान विभागाच्या एका लिपिकाचा सत्कारही करण्यात आला. मात्र, उद्यान विभागाने ऐनवेळी माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तब्बल 20 कर्मचार्‍यांचा सन्मान करून घेतला. उद्यान विभागाच्या तब्बल 21 कर्मचार्‍यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. त्याबद्दल महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

गुणवंत कामगार निवडीसाठी नियमावली करणार

गुणवंत कामगार म्हणून सन्मान करण्यासाठी कर्मचार्यांची निवड करताना काही तरी निकर्ष ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून नियमावली करण्यात येणार आहे. महापालिका वर्धापनदिनी सोहळ्यात खरोखरच गुणवंत कर्मचार्‍यांचा गौरव होणे अपेक्षित आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

Nashik Crime : हप्ता दिला नाही म्हणून पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

Kasba Beed : कसबा बीड ही प्राचीन युद्धभूमी

Kolhapur Panchganga Flood : कोल्हापूरला महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे!

Back to top button