Kolhapur News | कोल्हापुरातील ‘सोन्याचा पाऊस पडणारे गाव’ प्राचीन काळी होते युद्धभूमी – संशोधनातील निष्कर्ष

Kolhapur News | कोल्हापुरातील ‘सोन्याचा पाऊस पडणारे गाव’ प्राचीन काळी होते युद्धभूमी – संशोधनातील निष्कर्ष

कोल्हापूर :  तगरचे शासक असणाऱ्या शिलाहार वंशाचा राजा जीमूतवाहनाच्या कुळात जन्मलेला गंडरादित्य व त्याचा पुत्र विजयादित्य यांच्या सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या शिलालेखाचे वाचन करण्यात इतिहास संशोधकांना यश आले आहे. सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशी ख्याती असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड (ता. करवीर) या गावी हळे कन्नड लिपीतील शिलालेखात दडलेली महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यामुळे कसवा बीड प्राचीन युद्धभूमी असल्याचा दावा शिलालेख अभ्यासकांनी केला आहे. (Kolhapur News)

कसबा बीड गावातील भोगावती नदीच्या किनारी असणाऱ्या राजाराम वरुटे यांच्या शेतातील मंदिराचे अवशेष, मूर्ती शिल्प, वीरगळ व शिलालेख तुकडे आहेत. या ठिकाणी पूर्वी एक मोठा शिलालेख होता. त्यांचे चार ते पाच तुकडे झाले होते. यातील दोन तुकडे पूर्वी सापडले होते.. त्या शिलालेखाच्या तुकड्यांचे वाचन कन्नड भाषा अभ्यासक डॉ. श्रीनिवास रित्ती, कोल्हापुरातील इतिहास संशोधक अनंत करवीरकर व बाबा महाराज पंडित यांनी केले होते. त्यांचे वाचन व प्रकाशन कर्नाटक विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिलालेख या पुस्तकातून करण्यात आले होते. शिलालेखाचे उर्वरित तुकडे वरुटे यांच्या शेतात इतरत्र गाडले गेले होते. नव्याने सापडलेला शिलालेखाचा तुकडा खोदीव स्वरूपाचा असून ११ ओळीचा हळे कन्नड लिपीत संस्कृत भाषेत आहे.

कालौघात वातावरणामुळे शिलालेखावरील अक्षरे पुसट झाली आहेत. दोन्ही तुकड्यांची एकत्रित जोडणी करून ३१ ओळींच्या शिलालेखाचे संशोधन करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी शिलालेख संशोधक अनिल दुधाने (पुणे) यांनी केली आहे. शिलालेखाचे वाचन डॉ. श्रीनिवास रित्ती व त्यांचे शिष्य डॉ. श्रीनिवास पडीगर यांनी केले आहे. यासाठी राजाराम नानासो वरुटे (नाईक), तानाजी वरुटे , अमित वरुटे, युवा अभ्यासक चैतन्य अष्टेकर, आशिष कुलकर्णी, विकास नाईक यांचे सहकार्य लाभले. (Kasba Beed)

शिलालेखातील ओळींचा अर्थ असा…

त्याचा (बल्लाळाचा) धाकटा भाऊ 'गंडरादित्य' या नावाने प्रसिद्ध झाला. तो पृथ्वीवरील धर्माची धुरा सांभाळणारा, सर्व लोकांना आपापल्या कर्तव्याचे पालन करायला लावणारा आणि धैर्यवान लोकांमध्ये अग्रस्थानी होता. त्याने विपुल प्रमाणात दाने दिली. तो गुप्तपणे दान देत असे व सदैव असहाय, गरीब व दुः खीजनांच्या संरक्षणात आणि ब्राह्मणांना संतुष्ट करण्यात गुंतलेला असे. त्याने १६ प्रकारचे व्रत पूर्ण केले होते व तो नैतिकतेच्या बाबतीत भीष्म (गांगेय) प्रमाणे होता. (Kasba Beed)

करवीर तालुक्यातील कसबा बीड गाव परिसर प्राचीन काळात युद्धभूमी होते. शेजारच्या आरे गावात एका वीरगळीवर १२ व्या शतकातील शिलाहार राजवंशाच्या गंडरादित्य राजाच्या काळातील शिलालेख आढळला आहे. या गंडरादित्य राजाचा नातू राजा भोज (द्वितीय) याच्या शके १११२ च्या कोल्हापूर शिलालेखात देखील बीड गावाचा उल्लेख आहे. यामुळे कसबा बीड हे गाव एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक केंद्र असल्याचा पुरावा सदरच्या शिलालेख आहे.
– अनिल दुधाणे (शिलालेख संशोधक)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news