Artificial Intelligence : एआय म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती; घ्या जाणून | पुढारी

Artificial Intelligence : एआय म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती; घ्या जाणून

गणेश खळदकर

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशिन्समध्ये आणि त्या मशिनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजेच एआय आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रांत वापर केला जातो.

करिअर करायचे असेल तर…

सायन्स अर्थात विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पोस्ट-ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम, पीजी प्रोग्राम इन मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्यासाठीचे अभ्यासक्रम आहेत. संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत.

स्पेशलायझेशन

आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित विविध क्षेत्रांत एक्स्पर्ट (तज्ज्ञ) होता येते. स्ट्राँग एआय, लिमिटेड मेमरी, रिअ‍ॅक्टिव्ह मशिन्स, थिअरी ऑफ माईंड व सेल्फ अवेअर असे विविध प्रकार आहेत. एआय तंत्रज्ञानाच वापर जवळजवळ सर्वच क्षेत्रांत कमीअधिक प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ऑटोमेशन, सोशल मीडिया, स्वयंचलित वाहने, रोबोटिक्स, वाहतूक, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार असून नवी कामे व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत.

एआयचा कुठे होतो वापर?

ट्रॅव्हल आणि नेव्हिगेशन

जगात कुठेही गेलो तरी आपण आता सहजपणे गुगल मॅपचा वापर करतो. एआयच्या वापरातूनच हे शक्य होते. या क्षेत्रात प्रचंड संशोधन चालू असून लोकेशन्सचा वापर करून एआयमार्फत प्रवासाला अधिकाधिक वास्तवतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियामध्ये जे काही पहायला मिळते त्यामध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. आपल्याला कोणता मजकूर पहायला आवडतो त्याप्रमाणे आपल्यासमोर कंटेट येत राहतो. या कंटेंटमध्ये प्रिंट, ऑडिओ व्हिज्युअल, असे सर्व प्रकार येतात आणि सोशल मीडियातले प्लॅटफॉर्मसही येतात.

सिक्युरिटी आणि सर्विलन्स

आपण सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाहतो. या सर्व कॅमे-यांच्या यंत्रणेची कार्यप्रणाली एआय तंत्रांवरच आधारित असते. या क्षेत्रात यापुढे वस्तू आणि साधनांचे लोकेशन ओळखणे किंवा कोणत्याही चेह-याची ओळख साठवून त्यानुसार माहिती मिळवण्यावर भर राहणार आहे. गुन्हेगारांना शोधण्यासाठी व सुरक्षेसाठी या प्रणालींचा वापर उपयुक्त आहे.

व्हॉइस आसिस्टंटचा वाढता वापर

आपल्या मोबाईलमधील सिरी, अलेक्सा, गुगल व्हॉइस असिस्टंट आदी तंत्रज्ञान हे एआय बेस्ड्च आहे. यापुढील काळात अशा प्रकारच्या अनेक सुविधा निर्माण होणार आहेत. कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून यंत्रांनी भाषा शिकण्यावर खूप संशोधन सुरू आहे.

आरोग्य सुविधा…

एआयचा वापर करून आरोग्य क्षेत्रात क्रांती घडत आहे. डोळ्यांच्या कॅचरॅक्टपासून कॅन्सरपर्यंत अनेक आजार लवकर निदान झाल्याने बरे होतात. सर्वसामान्यांच्या तपासण्या करून त्यांची आरोग्यविषयक माहिती साठवणे व त्याचे त्वरित विश्लेषण करून निदान करणे एआयच्या मदतीने शक्य झाले आहे.

शिक्षण

एआयचा वापर प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण व आकलन सुधारण्यासाठी होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलनाची क्षमता वेगळी असल्याने शिक्षकांना सरासरी वेगाने शिकवावे लागते, त्यामुळे हुशार मुलांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून पर्सनालाईज्ड लर्निंगचा वापर या पुढील काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

न्याय आणि सुरक्षा

समाजातील सर्वसामान्य घटकाला न्याय आणि सुरक्षा देण्यासाठी एआयचा वापर होत आहे. गुन्ह्यांपासून संरक्षण होण्यासाठी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हा घडला की त्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना साहाय्य करणे, पोलिसांनी योग्य कार्यवाही करावी म्हणून मदत करणे व शेवटी न्याय मिळवण्यासाठी एआयचा वापर सर्व प्रणालींत केला जात आहे.

अवकाश संशोधन…

चांद्रयानाच्या संशोधनात साहाय्य करण्यापासून उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवरील हवामानाची, शेतीची, जंगलाच्या संरक्षणाची माहिती मिळवण्यासाठी एआयचाच वापर केला जात आहे.

हेही वाचा

चंद्रपूर : राजूरा येथील धमाल दांडीयाची आमदारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Navratri 2023 : पुण्यात दुसर्‍या माळेला मंदिरांत गर्दी

अफगाणिस्तानकडून राजसत्तेचा पाडाव

Back to top button