चंद्रपूर : राजूरा येथील धमाल दांडीयाची आमदारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार | पुढारी

चंद्रपूर : राजूरा येथील धमाल दांडीयाची आमदारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा सर्वत्र नवरात्र महोत्सवाला दांडीयाची धूम पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी दांडीयाच्या माध्यमातून जागर केला जात आहे. परंतु राजूरा येथील प्राथमिक शाळेत सुरू असलेल्या धमाल दांडीया धूमची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ज्या प्राथमिक शाळेमध्ये दांडीया सुरू आहे, त्या शाळेजवळच उपजिल्हा रूग्णालय आहे. दांडीयाच्या दणदणाटाच्या आवाजाने विविध आजाराने रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना प्रचंड त्रास होत आहे. याबात रूग्ण आणि नागरिकांनी डिजेच्या आवाजाला कंटाळून आमदारांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

रविवार पासून राजुरा येथे नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये पहिल्यांदाच धमाल दांडिया कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. चाळीस मिटर अंतरावर 100 खांटाचे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी परिसरातील दुर्धर आजाराचे रुग्ण, लहान बालके, गरोदर माता इत्यादी 100 ते 150 रूग्ण 24 तास नियमीत भरती असतात. डी.जे. च्या 100 (dB) डेसीबल च्या आवाजात सुरू असलेल्या कर्कश आवाजामुळे उपजिल्हा रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना प्रचंड त्रास होत आहे. रहिवास वापर व रूग्णालय परिसरात रात्रीच्या वेळेस 40 ते 45 (dB) डेसीबल आवाजाची मर्यादा असतांना नियमांचे उलंघन करून शासकीय कार्यालयाच्या परिसरात कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

आमदार सुभाष धोटे यांनी संवेदनशील ठिकाणी देण्यात आलेल्या दांडियाच्या परवानगी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रूग्ण व नागरिकांनी होत असलेल्या त्रासाबाबत आमदार महोदयांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आमदार महादेयांनी अतिशय संवेदनशील क्षेत्रात असलेल्या राजूरा येथील प्राथमिक शाळेतील धमाल दांडियाची परवानगी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दल नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button