Navratri festival : तोरणागडावर विजेचा लखलखाट; ऐतिहासिक नवरात्रोत्सवात साज | पुढारी

Navratri festival : तोरणागडावर विजेचा लखलखाट; ऐतिहासिक नवरात्रोत्सवात साज

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दुर्गम तोरणागडावर नवरात्रोत्सवात अखेर विजेचा लखलखाट झाला आहे. प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गडावरील शिवकालीन श्री मेंगाईदेवी मंदिरात विद्युतीकरण करण्यात आले आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने ऐन नवरात्रोत्सवात मंदिर व गडाचा परिसर उजळून निघाला आहे. शिवकालीन नवरात्रोत्सवाला प्रथमच यंदा ऐतिहासिक साज आला आहे.

ऐन नवरात्रोत्सवात गडावर विजेचा लखलखाट झाल्याने पर्यटकांसह भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. गडाच्या परिसरात दोन वर्षांपासून विद्युतीकरण झाल्याचा डिंगोरा पिटविण्यात आला. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, महावितरण व पुरातत्त्व विभाग ठप्प पडल्याने तोरणागडावरील शिवकालीन श्री मेंगाई मंदिरासह सर्व ऐतिहासिक वास्तू, स्थळे अंधारातच होती.

विद्युतीकरणाचा गाजावाजा करण्यासाठी गडाच्या हनुमान बुरुजावर एक दिवा लावला होता. नवरात्रोत्सवानिमित्त गडावर वीजपुरवठा करण्यासाठी वेल्हे येथील ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साकडे घातले. त्याची दखल घेत जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. टी. राठोड आदींनी वीज पुरवठ्यासाठी पाठपुरावा केला.

उपविभागीय अभियंता नवनाथ घाटुळे यांनी बुरुजापासून मंदिरापर्यंत जवळपास एक किलोमीटर अंतराची केबल उपलब्ध करून दिली. वेल्हे येथील शाखा अभियंता विनोद थाटे, संतोष शिंदे, कर्मचारी गणेश शिंदे, अमोल डांगे, संदीप दर्डीगे, पुरातत्व खात्याचे पहारेकरी दादू वेगरे आदींनी परिश्रम घेत घटस्थापनेपूर्वी मंदिरात वीजपुरवठा केला.

वेल्हेचे माजी उपसरपंच सुनील राजिवडे म्हणाले, ’गडावरील विद्युतीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी यानिमित्ताने अखेर पूर्ण झाली आहे.’ माजी उपसरपंच सुनील राजीवडे, प्रदीप मरळ, मालवलीचे माजी सरपंच मंगेश कोडातकर, विकास कदम, संतोष गायके, तानाजी राजावडे, गणेश भुरुक यांच्यासह ग्रामस्थांनी विद्युतकरणासाठी परिश्रम घेतले.

गडाच्या बुरुजापासून श्री मेंगाई मंदिरांसह ऐतिहासिक वास्तू, प्रवेशद्वाराच्या परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

-डॉ. विलास वाहणे, सहसंचालक,
पुरातत्त्व विभाग

हेही वाचा

अफगाणिस्तानकडून राजसत्तेचा पाडाव

भिडेवाडा जिंकला! पुण्यात रिपाइं-भाजप-राष्ट्रवादीकडून जल्लोष

Pune Accident News : टँकरच्या धडकेत आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मुलींचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

Back to top button