येरवड्यातील ‘त्या’ जागेवर पोलिस ठाणेच

येरवड्यातील ‘त्या’ जागेवर पोलिस ठाणेच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात येरवड्यातील पोलिस ठाण्याबद्दल उल्लेख आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, प्रारंभापासून त्या जागेवर येरवडा पोलिस ठाणे असून, ते अद्यापही तेथेच कार्यरत आहे. ती जागा एका विकसकाने मागितली होती. मात्र, पोलिस ठाण्याची जागा देण्यास राज्य सरकारने नंतर नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला होता.

येरवडा येथील पोलिस दलाच्या तीन एकर जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात त्यांच्यावर आरोप केल्याची चर्चा सुरू झाली. पोलिस ठाण्यालगत एका विकसकाची जागा होती. तेथील जागेचे विकसन करताना पोलिसांनी त्या ठाण्याची जागा द्यावी, तेथे नवीन पोलिस ठाणेही बांधून देतो, असा प्रस्ताव विकसकाने तेव्हा दिला होता. पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड, तत्कालीन पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग तसेच तत्कालीन मुख्य सचिव अय्यंगार मॅडम यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना बैठक घेऊन त्या प्रस्तावाबाबत सांगितले होते.

बंड यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला म्हणाले की, शिवाजीनगर येथील पोलिस वसाहत मोडकळीस आली होती. तेव्हा मुख्य रस्त्यावर पोलिस स्टेशन आणि मागे वसाहत बांधता येईल, असा प्रस्ताव समोर आला. तेव्हा सल्लागार नेमून निविदा काढण्यात आली होती. सात लोकांच्या समितीने पाठविलेला प्रस्ताव शासनानेही मान्य केला होता. काम सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतर पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्या प्रस्तावाला सहमती दिली नव्हती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news