Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा भीषण अपघात; चौघांचा होरपळून मृत्यू | पुढारी

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा भीषण अपघात; चौघांचा होरपळून मृत्यू

पुणे/धायरी : पुढारी वृत्तसेवा : मुंबई- सातारा महामार्गावर ट्रक व कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात ट्रक पेटून चार जण होरपळून मृत्युमुखी पडले. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास नवले पूल परिसरात घडली. भरधाव ट्रकने एका कंटेनरला धडक दिली. पुढे हाच सुसाट ट्रक आणखी एका कंटेनरवर आदळला.

मृतांपैकी केवळ एकाची ओळख पटली असून गोविंद जाधव (चालक) असे त्याचे नाव आहे. मक्याच्या पिठाने भरलेला ट्रक सातार्‍याकडून मुंबईच्या दिशेने निघाला होता. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास नवले पूल परिसरातील स्वामिनारायण मंदिराच्या परिसरात आल्यानंतर ट्रकने सुरुवातीला एका कंटेनरला धडक दिली. त्यानंतर अन्य कंटनेरवर पाठीमागून आदळला. हा अपघातात एवढा भीषण होता की यामध्ये केबिनमध्ये असलेल्यांना बाहेर पडता आले नाही.

अपघातानंतर आगीने तत्काळ पेट घेतल्याने घटनेत चौघे होरपळे तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्मिशामक दलाच्या चार व पीएमआरडीए अग्निशामक दलाची तीन वाहने व सिंहगड रस्ता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी, अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत मृतदेह बाहेर काढत जखमींना परिसरातील नवले रुग्णालयात दाखल केले. मुंबई-सातारा महामार्गावर ही घटना घडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा

पंजाबमधील ‘जलसंकट’

Navratri 2023 : दुर्गेचे तिसरे रूप : चंद्रघंटा

कंत्राटी भरतीमागे षड्यंत्र : जयंत पाटील

Back to top button