कंत्राटी भरतीमागे षड्यंत्र : जयंत पाटील | पुढारी

कंत्राटी भरतीमागे षड्यंत्र : जयंत पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्याशिवाय दुष्काळ, महागाई, आरक्षण असे विविध प्रश्न आहेत. कंत्राटी भरतीतून लोकांचे लक्ष विचलीतचा सरकारचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केली.

एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, महागाई, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. सध्या राज्य सरकारने कंत्राटी पध्दतीने नोकरभरतीच्या निर्णयाने तरुणांमध्ये मोठी नाराजी आहे. तरुणांसाठी एमपीएससीव्दारे होणार्‍या भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातीलही काही जागा कंत्राटीने भरल्या जातील, यावर त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. महसूलच्या नोंदीवरून मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील 138 केडरमध्ये कंत्राटी भरतीसाठी सरकारकडून 9 एजन्सी नियुक्त केल्या आहेत. राज्यात नोकरभरती, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, आरक्षण असे वेगवेगळे मुद्दे असताना जाणीवपूर्वक वेगळे प्रश्न निर्माण करीत आहेत.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत ते म्हणाले, मोदी आहेत तर जगात काहीही शक्य आहे. चंद्रकांत पाटील जर मोदी, नवीन युनो तयार करू, असं म्हणत असतील, तर त्यांचा विश्वास खरा ठरो. पण युनो करण्याचा कालावधी ठरला पाहिजे. लोकसभा निवडणुकीआधी केल्यास बरं होईल, असा उपरोधीक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले, मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील मजकूर आपण सोशल मीडियातून पाहिला. त्यांच्यामागे सूत्रधार कोण आहे, आपणाला माहिती नाही.

जरांगे-पाटील यांच्या सभेतील वीज खंडित कशी

बीडमधील मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेदरम्यान आसपासच्या गावात वीज आणि इंटरनेट खंडित होण्याचा प्रकार, हा राज्य सरकारचा निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक, याबाबत पाहणे आवश्यक आहे, असेही पाटील म्हणाले.

Back to top button