तुरुंगातून सुटका हवी…? शपथेवर मिळेल बनावट जामीनदार !

तुरुंगातून सुटका हवी…? शपथेवर मिळेल बनावट जामीनदार !

पुणे : कारागृहातून बाहेर पडण्यासाठी बनावट कागदपत्रे तसेच बनावट व्यक्ती उभी करून त्याआधारे जामीन मिळविण्याची शक्कल गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून अमलात आणली जाऊ लागली आहे. आरोपी व जामीनदार यांची ओळख नसतानाही बनावट कागदपत्रांसह व्यक्ती उभे करून शपथेवर जामीन मिळविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उघडकीस आलेल्या बोगस जामीनदाराच्या प्रकरणानंतर न्यायालयाची फसवणूक करण्यासाठी न्यायालय आवारातच बनावट जामीनदार मोकाट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

फौजदारी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर कारागृहातून बाहेर पडण्यासाठी आरोपींना जामिनाच्या प्रक्रियेतून जावे लागते. त्यासाठी आरोपींना जामीनदारासह त्याच्या शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते. किरकोळ गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये जामीनदार मिळून जातो. मात्र, गंभीर गुन्ह्यात जामीनदार राहण्यासाठी नागरिक टाळाटाळ करतात. त्यासाठी कारागृहात असलेले आरोपी हवी ती किंमत मोजण्यास तयार होतात. आरोपींची हीच गोष्ट हेरून न्यायालय आवारात असणारे टोळके आरोपी, तसेच त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचतात.

प्रत्यक्षात जामिनाच्या दिवशी बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयात बनावट व्यक्तीला पाठविण्यात येते. न्यायालयात संबंधित व्यक्ती कोणाला जामीनदार राहिली आहे का? तसेच कागदपत्रामधील व्यक्ती तीच आहे का? याची शहानिशा होते. कागदपत्रांच्या छाननीनंतर त्यामार्फत न्यायालयात शपथपत्र सादर करीत त्यानंतर न्यायालयाकडून जामीन मंजूर करवून घेत असल्याचे वकीलवर्गाकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.

जामीन प्रकरणात कागदपत्रे तसेच व्यक्तीची शहानिशा करण्यासंदर्भात कोणतीही सक्षम यंत्रणा न्यायालय व पोलिसांमध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयातील न्यायालयीन व पोलिस यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. बोगस जामीनदार हे वकीलवर्गासाठीही त्रासदायक ठरत असून, यासारख्या प्रकरणांमुळे वकीलवर्ग नाहक अडचणीत येतात.
                       अ‍ॅड. हेमंत झंजाड, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

न्यायालयातील प्रशासकीय कार्यालयामध्ये कागदपत्रांची शहानिशा करताना जामीनदारांकडे बारकोड असलेल्या शासकीय कागदपत्रांचा आग्रह होणे आवश्यक आहे. कारण, सध्य:स्थितीत शासकीय कागदपत्रांवर बारकोडचा वापर वाढला असून, त्यानुसार ती स्कॅन करणारी यंत्रणाही उपलब्ध व्हावी. सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार पॅनकार्ड, रेशनकार्ड यांसह अन्य कागदपत्रे बनावट तयार करणे सहज शक्य झाले आहे.
                                  अ‍ॅड. अजिंक्य मिरगळ, फौजदारी वकील

बोगस जामीनदारांचा प्रश्न चर्चेत?
कंपनीचे कंत्राट मिळवून देतो म्हणून फसवणूक केल्या प्रकरणातील धर्मेंद्र शहा याने विजय गोपाळे यांच्या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये, त्याने गोपाळे यांच्या मिळकतीचे सॉल्वन्सी सर्टिफिकेट मावळच्या तहसीलदारांकडून तयार करवून घेतले. त्याआधारे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. यादरम्यान गोपाळे यांनी आपण आरोपीला ओळखत नाही, तसेच त्याला जामीनही राहिलो नसल्याचा अर्ज अ‍ॅड. हेमंत झंजाड यांमार्फत न्यायालयात केला. बनावट कागदपत्रे व व्यक्तीद्वारे जामीन घेतल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने 29 ऑगस्ट 2023 रोजी तत्काळ जामीन रद्द करत शहा यांना न सोडण्याचे आदेश कारागृहाला दिले होते. त्यानंतर, बनावट जामीनदाराविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news