पुणे : पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून, या काळात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात परराज्यातून साबूदाणा, शेंगदाणा, भगर आदी जिन्नस दाखल झाले आहेत. उपवासकाळात सेवन केले जाणारे हे जिन्नसही महागाईच्या विळख्यात आले असून, त्यांना आत्तापर्यंतचा उच्चांकी भाव मिळत आहे. नवरात्रोत्सवामुळे मागणी असली तरी उच्चांकी दरामुळे एरवीच्या तुलनेत ती कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संबंधित बातम्या :
नवरात्रींच्या उपवासानिमित्त भाविकांकडून साबूदाणा, भगर, राजगिरा, शिंगाडा, कुट्टू, शेंगदाणा यांसह त्यांपासून तयार होणार्या पिठांना दरवर्षी मोठी मागणी राहते. घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात घटस्थापना होत असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात उपवासाच्या साहित्यांना मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातून एक्स्ट्रा सुपर फाइन, मिल्क व्हाईट आणि साधा या प्रकारामधील साबूदाणा दाखल होत आहे. देशात फक्त या ठिकाणीच साबूदाण्याचे उत्पादन घेतले जाते. तेथून संपूर्ण देशात तो विक्रीसाठी पाठविला जातो. मात्र, यंदा तेथे पाऊस कमी झाला आहे. परिणामी, उत्पादन कमी झाले आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज 150 ते 200 टन आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत ही कमी आवक आहे. नवरारोत्सव काळात येथे दररोज 250 ते 300 टन आवक होत असते. मागील वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात साबूदाण्याला किलोला तब्बल 15 रुपये जास्त भाव मिळत आहे. 15 दिवसांपूर्वीही भावात 3 ते 4 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आता 2 रुपयांनी घसरण झाली आहे.
कर्नाटक, गुजरात आणि राज्याच्या विविध भागांतून गुजरात जाडा, कर्नाटक घुंगरू आणि स्पॅनिश शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी बाजारात शेंगदाण्याचा तुटवडा होता. मात्र, आता सुरळीत आवक सुरू झाली आहे. सध्या भाव तेजीत आहेत. मात्र, दिवाळीत आवक वाढेल. त्या वेळी भावात घसरण होण्यास सुरुवात होईल. सध्या गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक येथून शेंगदाण्याची आवक होत आहे. दररोज 100 ते 150 टन आवक होत आहे. भगरीचे भावही तेजीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के जास्त भाव मिळत आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून भगरीच्या कच्च्या मालाची आवक होते. तेथून नाशिक जिल्ह्यातून प्रक्रिया करून माल येथील मार्केट यार्डत दाखल होत असतो. दररोज सुमारे 100 टन भगरीची आवक होत आहे. याखेरीज, उत्तर भारतातूनही शिंगाडा, कुट्टू आदी पदार्थांची मोठी आवक वाढत असल्याचे व्यापारी अशोक लोढा
यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील प्रतिकिलोचे भाव
साबूदाणा 1 80 रुपये
साबूदाणा 2 77 रुपये
साबूदाणा 3 72 रुपये
भगर 1 100-105 रुपये
भगर 2 95-100 रुपये
शेंगदाणा
स्पॅनिश 125-135 रुपये
घुंगरू 115-125 रुपये
हलका 100-100
नवरात्रोत्सवात बहुतांश नागरीकांकडून उपवास केले जातात. या काळात, खिचडी, भगर, दशमी, पुरी, भाजणी, थालीपीठ तयार करण्यासाठी साबुदाणा, भगर, राजगिरा यांसह त्यांच्या पिठांना मोठी मागणी राहते. उपवासामुळे यंदा जिनसांना मागणी चांगली आहे. मात्र, उच्चांकी दरामुळे एरवीच्या तुलनेत ती कमी आहे.
– आशिष दुगड, साबूदाणा व भगर विक्रेते, मार्केट यार्ड