धक्कादायक ! बांगलादेशी मुलीला देशात कामासाठी आणून अतिप्रसंग | पुढारी

धक्कादायक ! बांगलादेशी मुलीला देशात कामासाठी आणून अतिप्रसंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बांगलादेशातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने भारतात आणून तिला पुन्हा बांगलादेशात सोडतो सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा व नंतर बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तिच्यावर घडलेला अतिप्रसंग तिने पोलिसांना सांगितल्यानंतर भयानक आपबिती समोर आली. महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

युसुफ इरन मुल्ला (21, बांगलादेश), ताहेरा इरान मुल्ला ऊर्फ वर्षा (25, रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे साथीदार नईमा, शाहीकुल, बोवकार मंडोल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 17 वर्षांच्या मुलीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची बांगलादेशी असलेल्या या तरुणीला नईमा या महिलेने काम मिळवून देण्याचे सांगून बांगलादेशातून आणले. पालघर येथे तिचे आधारकार्ड बनवून घेतले. त्यानंतर तिला चेन्नई येथे नेण्यात आले. त्याठिकाणी नईमाच्या मामाने पीडितेसोबत अत्याचार केले.

वारंवार होणार्‍या अत्याचाराला कंटाळून पीडितेने ओळखीच्या शाहीकुल याने नंबर दिलेल्या बोवकार मंडोल याच्याशी संपर्क केला. त्यावर मंडोलने बांगलादेशात सोडतो, असे सांगून मुंबई येथे जबरदस्तीने लग्न करून तिच्यासोबत संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. पीडित मुलीने याला नकार दिला असता तिला मारहाण केली. यानंतर पीडितेने तिच्या आईने दिलेल्या काकाच्या नंबरवर फोन केला असता काका युसुफ याने तिला बांगलादेशात सोडतो, असे सांगून त्याची पुण्यात राहणारी बहीण ताहिरा हिच्याकडे आणून सोडले.

ताहिराने मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. पीडित मुलीने नकार दिला असता ताहिराने तिला शिवीगाळ करून मारहाण करून डांबून ठेवले. पीडित मुलीने डांबून ठेवलेल्या ठिकाणावरून आपली सुटका करून घेत स्वारगेट गाठले. ती स्वारगेट पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रसंग स्वारगेट पोलिस ठाण्यात सांगितला. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अश्विनी पाटील, अंमलदार तुषार भिवरकर, बाबा कर्पे, संदीप कोळगे यांच्यासह पथकाने संबंधित मुलीकडे चौकशी केली. या चौकशीमध्ये तिने आरोपींबद्दल सांगितले.
त्याचवेळी अंमलदार सागर केकाण, अमेय रसाळ यांना आरोपींविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी युसूफ आणि ताहिरा यांना पोलिसांनी बुधवार पेठेतून ताब्यात घेतले. चौकशीत दोघेही बांगलादेशीय असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यासह साथीदारांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Back to top button