Pune News : आजारी असतानाही पर्यावरणाचाच ध्यास; डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केली तळमळ

Pune News : आजारी असतानाही पर्यावरणाचाच ध्यास; डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केली तळमळ

पुणे । पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ हे गंभीर आजारी असतानाही एका पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहिले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतानाही 20 मिनिटे भाषण करीत पर्यावणाविषयी तळमळ व्यक्त केली. केसरी-मराठा संस्था व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक' पुरस्कार डॉ. गाडगीळ यांना 'एक प्रेमकहाणी' या पुस्तकासाठी केसरी-मराठा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शनिवारी (दि. १४) प्रदान करण्यात आला. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक उपस्थित होत्या. हा सोहळा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पार पडला.

श्वास घेण्यास त्रास होत असतानानाही डॉ. गाडगीळ यांनी कणखर भूमिका मांडत पर्यावरणाविषयी तळमळ व्यक्त केली. ते म्हणाले, 'पश्चिम घाटात उभारलेल्या काही प्रकल्पांमुळे स्थानिक व्यवसायांवर गदा आली आहे. धनदांडग्यांसमोर स्थानिकांचा निभाव लागत नसल्याने अनेक ठिकाणी रोजगाराचे स्वरूपच बदलले आहे. परंपरागत मासेमारी करणा-या मच्छिमारांना चक्क शिंप्याचे काम करावे लागत आहे. तक्रार करूनही लोकप्रतिनिधी त्याची दखल घेत नाहीत. लोकशाहीचा हा किती आचरटपणा आहे.'

बालपणीच्या आठवणीत रमले …..

डॉ. गाडगीळ म्हणाले, 'मला लहानपणापासून निसर्गाची आवड, माझे वडील फिरायला घेऊन जात. आमचे घर वेताळ टेकडीच्या जवळ असल्याने मी टेकडीवर फिरायचो. मला एकदा वेडा राघू दिसला. त्याचे मी निरीक्षण केले. त्याच्या शेपटीचे पीस गळाले होते. वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी डॉ. सलीम अली यांना पत्र लिहून विचारायला सांगितले. मी पत्र पाठविल्यानंतर त्यांनी लगेच उत्तर पाठविले. त्यात म्हटले होते की, त्या वेड्या राघूच्या शेपटीचा रंग बदलत असतो. शेपटी गळून गेल्यानंतर नवीन फुटते. हे ऐकून मला आनंद झाला. त्यानंतर मला पक्षी, निसर्ग, कीटक यांची खूप आवड निर्माण झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news