Ajit Pawar : अजित पवारांकडून कारवाईचा बडगा नाहीच | पुढारी

Ajit Pawar : अजित पवारांकडून कारवाईचा बडगा नाहीच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी शुक्रवारी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना आढावा बैठकीत बोलावून झाडाझडती घेतली. मात्र, दोषींवर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले नसल्याने एक प्रकारे ससून प्रशासन आणि आरोपीच्या पिंज-यात असलेल्या मंत्र्यांना अजित पवार अभय देत असल्याची चर्चा सुरू आहे. ससून रुग्णालयातून दहा दिवसांपूर्वी ड्रग प्रकरणातील आरोपी पळून गेला.

ललित पाटीलची बडदास्त ठेवण्यासाठी दादा भुसे यांनी ससूनच्या डीनना फोन केल्याचा आरोप विरोधी पक्षातील राजकारण्यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ललित पाटीलसाठी ससून रुग्णालयात फोन केल्याचे समोर येत आहे. पोलिस प्रशासन आणि ससून प्रशासनातील अधिका-यांच्या मदतीने पाटील ड्रग रॅकेट चालवत होता आणि त्यांच्याच मदतीने पळून गेला, असे आरोपही होत आहेत. मात्र, याबाबत अद्याप ससूनमधील कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही.

ससून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. कैद्यांना इतके दिवस ससूनमध्ये का ठेवले, ललित पाटील पळून जाताना कॅमेरे कोणी फिरवून ठेवले, लाईट कोणी बंद केले, डॉक्टरांवर कारवाई का केली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, केवळ झाडाझडतीचा फार्स करण्याऐवजी उपमुख्यमंत्री या नात्याने थेट कारवाईची शिफारस का केली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह विभागीय आयुक्तांना ससूनमधील दोषींवर कारवाई करण्याची शिफारस करू शकतात. चौकशीचे भिजत घोंगडे ठेवण्याऐवजी थेट कारवाईचा बडगा उगारल्यास ड्रग प्रकरणाचा पर्दाफाश होऊ शकतो. मात्र, आपल्या सहका-यांना वाचवण्यासाठी अजित पवार ठोस पावले उचलत नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

Lalit Patil case : ललित पाटील प्रकरणाचा तपास एसीपीकडे !

Samruddhi Mahamarg Accident : वैजापूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची मदत जाहीर

Operation Ajay: इस्रायलमधून भारताचे चौथे विमान 274 भारतीयांना घेऊन परतले

Back to top button