Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चैतन्यमयी पर्वास आजपासून प्रारंभ | पुढारी

Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चैतन्यमयी पर्वास आजपासून प्रारंभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आदिशक्तीच्या आगमनाच्या निमित्ताने देवीची मंदिरे विद्युतरोषणाईने उजळली आहेत…फुलांचे तोरण, रंगबिरंगी पताके आणि आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिरांना वेगळेच रूप प्राप्त झाले असून, रविवारी (दि.15) उत्साहपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. घरोघरीही उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मंडळांच्या ठिकाणी कार्यकर्ते जोमाने तयारी करत असून, आदिशक्तीच्या आगमनासाठी प्रत्येकजण सज्ज आहे. सकाळी मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून, घरोघरीही विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सगळीकडे चैतन्याची, उत्साहाची लहर आहे.

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये, घरोघरी आणि मंडळांनी विशेष तयारी केली आहे. मंदिरांमध्ये पदाधिकारी, मान्यवर आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत घटस्थापना होणार आहे. मंदिरात अभिषेक झाल्यावर घटस्थापना होईल आणि त्यानंतर महाआरती, काही धार्मिक कार्यक्रम होतील तसेच मंदिरांमध्ये फुलांची सजावट, विद्युतरोषणाई आणि दिवसभर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजिले आहेत. तर मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत.

मंदिरांमध्ये ऑनलाइन-ऑफलाइन दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षिततेसाठी मंदिरांमध्ये स्वयंसेवक तैनात असणार आहेत, तर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. मंडळांच्या नवरात्रोत्सवाची तयारीही पूर्ण झाली असून, शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळांकडून मान्यवरांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येईल. तसेच दिवसभर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.

सोसायट्यांमध्येही सकाळी घटस्थापना आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. घरोघरी पारंपरिक मराठमोळ्या पेहरावात महिला-युवती घटस्थापना करणार आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त उत्साहाचा रंग सगळीकडे बहरला आहे आणि प्रत्येकजण आनंदाने, हर्षोल्हासाने आदिशक्तीचे स्वागत करणार आहे. यानिमित्ताने घरोघरी पंचपक्वान्नही बनविण्यात येणार आहे. महिला – युवती उपवासही करणार आहेत. तसेच, घटस्थापनेसाठी लागणारे नैवैद्याचे पदार्थही त्या तयार करणार आहेत. पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी मैदाने, सभागृहांमध्ये दांडिया – गरबाचे कार्यक्रम होतील. एकूणच नवरात्र उत्सवाला रविवारी प्रारंभ होणार असल्याने जोश, जल्लोषात कोणतीही कमतरता नाही.

तयारीची लगबग

नवरात्र उत्सवाला रविवारपासून (दि.15) सुरुवात होणार असल्याने शनिवारी (दि.14) सगळीकडे तयारीची लगबग पाहायला मिळाली. मंदिरांसह घराघरांत घटस्थापनेच्या पूजेसाठीची तयारी सुरू होती. पूजेच्या साहित्याची जुळवाजुळव करण्यापासून ते घटस्थापनेसाठीच्या एकूणच तयारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यासाठीची लगबग दिसून आली.

घटस्थापना करा पहाटे पाचपासून ते दुपारी दोनपर्यंत

गणेशोत्सवानंतर आता आनंदाने, उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा होणार असून, सगळीकडे चैतन्याची लहर पाहायला मिळत आहे. यंदा नवरात्रोत्सव 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. यावर्षी रविवारी (दि. 15) घटस्थापना होऊन नवरात्रोरंभ होत आहे. यादिवशी चित्रा, नक्षत्र, वैधृती योग असला, तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने रविवारी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे पाचपासून ते दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे दाते पंचागाचे मोहन दाते यांनी सांगितले.

हेही वाचा

Pune Politics: पुण्यात भाजपचा उमेदवार गल्लीतील की दिल्लीतील !

Virat-Babar : बाबरने घेतली विराटची जर्सी! पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना मिर्ची झोंबली(Video)

Israel–Hamas war : गाझा सोडल्यास खबरदार! हमासची आपल्याच पॅलेस्टिनी नागरिकांना धमकी

Back to top button