Israel–Hamas war : गाझा सोडल्यास खबरदार! हमासची आपल्याच पॅलेस्टिनी नागरिकांना धमकी | पुढारी

Israel–Hamas war : गाझा सोडल्यास खबरदार! हमासची आपल्याच पॅलेस्टिनी नागरिकांना धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेले युद्ध नवव्या दिवशीही सुरू आहे. दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढत आहे. इस्रायलने उत्तर गाझातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्याचा इशारा दिल्यानंतर हजारो नागरिक दक्षिण गाझाकडे निघून जात आहेत. परंतू हमास आपल्याच पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तर गाझा सोडण्यापासून रोखत असल्याचे व धमकावत असल्याचा दावा इस्रायल संरक्षण दलाने केला आहे.

संबंधित बातम्या : 

इस्रायलने उत्तर गाझामधील ११ लाख लोकांना हा परिसर रिकामा करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे तेथे अराजकतेचे वातावरण आहे. याबाबत, संयुक्त राष्ट्राने दक्षिण गाझामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या स्थलांतरामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे म्हटले होते. परंतू हमास संघटना आपल्याच पॅलेस्टिनी नागरिकांना गाझा सोडण्यास बंदी घालत आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने ट्विटमध्ये लिहीले की, “आमच्याकडे पुरावे आहेत की पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तरेकडून दक्षिण गाझाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी हमास रस्त्यामध्ये अडथळे उभारत आहे.”

IDF ने काय इशारा दिला?

IDF ने गाझामधील लोकांना एक निवेदन जारी केले की, “पुढील आदेश जारी झाल्यावरच तुम्ही शहरात परत येऊ शकता. गाझा शहरातील घरे आणि गाझामधील निरपराध लोकांच्या घरांमध्ये बांधलेल्या बोगद्यांमध्ये हमासचे दहशतवादी लपून बसले आहेत. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, गाझा शहराच्या दक्षिणेकडील भागात जा आणि आपल्या कुटुंबाला हमासच्या दहशतवाद्यांपासून दूर ठेवा. हमास आपला ढाल म्हणून वापर करीत आहेत.”

इस्रायलची गाझावर जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी

इस्रायलने गाझावर जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी केली आहे. इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहला युद्ध आणखी तीव्र न करण्याचा इशारा दिला आहे. तसे केल्यास लेबनॉनचा नाश करण्याची धमकी दिली आहे.

युद्धात ३ हजार ५०० नागरिकांचा बळी

इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामधील मृतांची संख्या २२१५ वर पोहोचली आहे. यामध्ये ७२४ मुलांचा समावेश आहे. इस्रायलने उत्तर गाझातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्याचा इशारा दिल्यानंतर हजारो नागरिक दक्षिण गाझाकडे निघून जात आहेत.

हेही वाचा : 

Back to top button