Ajit pawar News : सांडपाणी प्रक्रिया न करणार्‍यांवर कारवाई करा; अजित पवारांचा आदेश | पुढारी

Ajit pawar News : सांडपाणी प्रक्रिया न करणार्‍यांवर कारवाई करा; अजित पवारांचा आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि कचर्‍यावर प्रक्रिया न करणार्‍या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांतून धरणात येणार्‍या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली. धरण परिसरात असलेल्या गावांतून येणार्‍या सांडपाण्यासाठी भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा. धरण परिसरातील 24 गावांतील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तत्काळ करावयाच्या उपाययोजनांची रूपरेषा तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाच्या सद्यःस्थितीबाबतही या वेळी आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयीन वेळ लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी 2-2 तास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी,असे निर्देश पवार यांनी दिले.
पवार यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकाबाबत माहिती घेतली. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रश्नाबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा

Sugar Factories News : साखर कारखान्यांच्या गोदामांची होणार तपासणी

क्रीडा : सुवर्णमय पायाभरणी

El Nino : यंदाचा अल निनो ठरला सर्वात प्रबळ; 17 राज्यांत अल्प

Back to top button