क्रीडा : सुवर्णमय पायाभरणी | पुढारी

क्रीडा : सुवर्णमय पायाभरणी

मिलिंद ढमढेरे

सहाशेहून अधिक जणांचे पथक असलेल्या भारताने आशियाई स्पर्धेतील 36 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी 22 क्रीडा प्रकारांमध्ये 28 सुवर्णपदकांसह 107 पदकांची कमाई केली. आगामी ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील, असा विश्वास यातून बळावला आहे. यादृष्टीने ‘खेळाडूंनी अर्थार्जनाची चिंता करू नये. फक्त सरावावर लक्ष केंद्रित करावे,’ हा केंद्र शासनाने दिलेला संदेश खूपच बोलका आहे.

भारतीय खेळाडूंनी चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ‘न भूतो न भविष्यती’ अशी ऐतिहासिक कामगिरी केली. 28 सुवर्णपदकांसह 107 पदकांची कमाई करीत भारताने भविष्यात आपण क्रीडा महासत्ता होऊ शकतो, याचीच झलक दाखवून दिली आहे. आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जेमतेम एक वर्ष राहिले असल्यामुळे भारताची ही कामगिरी म्हणजे या महासोहळ्यासाठी सुवर्णमय पायाभरणीच आहे, असे म्हणावे लागेल.

भारतीय खेळाडूंचे हे यश म्हणजे चमत्कार नसून, अतिशय नियोजनबद्ध केलेल्या सरावाच्या जोरावर मिळवलेले यश आहे. सहाशेहून अधिक जणांचे पथक असलेल्या भारताने आशियाई स्पर्धेतील 36 क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी 22 क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई झाली. एक-दोन खेळांचा अपवाद वगळता भारतीय पथकाची योग्यरीतीने झालेली निवड, खेळाडूंना मिळालेल्या भरपूर सुविधा, सवलती, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा भरपूर अनुभव, पदक विजेत्यांसाठी मोठ्या बक्षिसांचे आश्वासन, परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेले प्रशिक्षण, फिजिओ, मसाजिस्ट, मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञांसह सर्व आवश्यक सपोर्ट स्टाफ, खेळाडूंच्या सवलती व सुविधांबाबत केंद्र शासनातर्फे केला जाणारा पाठपुरावा, खेळाडूंच्या वैयक्तिक बँक खात्यात नियमितरीत्या दिली जाणारी शिष्यवृत्ती, यामुळेच भारतीय खेळाडूंना आशियाई स्पर्धेत घवघवीत यश मिळाले. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपद पी. टी. उषा या सुवर्णकन्येकडे आहे, तर भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला सांभाळत आहेत. त्यांच्याबरोबरच अन्य काही खेळांच्या राष्ट्रीय महासंघाच्या खेळाडूंकडे असलेले नेतृत्व हादेखील भारतीय खेळाडूंच्या यशामध्ये महत्त्वाचा घटक होता.

राम बाबूची उत्तुंग भरारी

भारतीय खेळाडूंच्या यशाला वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची किनार लाभली आहे. एका हॉटेलमध्ये नोकर म्हणून काम करणार्‍या राम बाबू या धावपटूने 35 किलोमीटर चालण्याच्या मिश्र शर्यतीत मिळवलेले ब्राँझपदक म्हणजे त्याने केलेल्या संघर्षाची पावती आहे. रात्री एक वाजेपर्यंत हॉटेलमध्ये काम करायचे आणि पुन्हा सकाळी साडेपाचला उठून धावण्याचा सराव करायचा, असा अनेक वर्षे त्याचा दिनक्रम होता. धावण्याच्या आवडीपायी तो हा संघर्ष अनेक वर्षे करीत होता. सैन्यदलात त्याला धावपटू म्हणून घेण्यात आले आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. इच्छाशक्ती असेल, तर कितीही अडचणी आल्या तरी यश मिळवता येते, हे त्याने दाखवून दिले आहे. मध्य प्रदेशच्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नेहा ठाकूर हिने मिळवलेले रौप्यपदकही असेच प्रेरणादायी आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठेही समुद्र नाही, तरीदेखील नेहा हिने आपल्या भावाच्या आग्रहाखातर यॉटिंग या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि भारताला या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक यश मिळवून देणारी नेहासारखी खेळाडू लाभली.

वैद्यकीय शाखेतील प्रवेश निश्चित असूनही त्याऐवजी नेमबाजीवरच लक्ष केंद्रित करणार्‍या सिफ्त कौर सामरा हिने 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात सोनेरी कामगिरी केली. मुख्य म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राऐवजी क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिच्या पालकांनी संपूर्णपणे पाठिंबा दिला आहे. सिफ्त कौर हिच्याबरोबरच पलक गुलिया, आशी चोक्सी, रमिता जिंदाल, रुद्रांक्ष पाटील इत्यादी युवा खेळाडूंनीही भारताला नेमबाजीमध्ये अनेक विश्वविक्रमांसह पदकांचा खजिनाच मिळवून दिला आहे. नेमबाजीमध्ये भारताला 22 पदकांची कमाई झाली आहे, हे या खेळाडूंच्या कष्टाचे प्रतीक आहे.

अ‍ॅथलेटिक्समधील घवघवीत यश

अ‍ॅथलेटिक्स म्हणजे पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो. यंदा भारताने या खेळामध्ये 29 पदके जिंकली. मुख्य म्हणजे, भारतीय खेळाडूंनी या क्रीडा प्रकारातील कमी अंतर, मध्यम अंतर, लांब अंतराच्या शर्यती, रिले शर्यती, भालाफेक, गोळाफेक इत्यादी सर्व फेकीचे प्रकार, वेगवेगळ्या उड्यांच्या प्रकारामध्ये घवघवीत यश मिळवले तसेच राष्ट्रीय विक्रम नोंदविले. ऑलिम्पिक आणि जागतिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने अपेक्षेप्रमाणे सोनेरी कामगिरी केली. त्याने पहिल्यांदा भालाफेक केली त्यावेळी संयोजकांनी सर्व्हर सुरू नव्हता म्हणून त्याला पुन्हा पहिल्यापासून भालाफेक करण्यास सांगितले. तसेच त्याचा सहकारी किशोरकुमार जेना यालाही पहिल्यांदा फाऊल देण्यात आले; मात्र त्याने आक्षेप घेतल्यानंतर त्याने फाऊल केले नाही व त्याने केलेली भालाफेक योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला. आपण नीरज याचे वारसदार आहोत, हे त्याने दाखवून दिले आहे. धावपटू ज्योती याराजी हिलादेखील सुरुवातीला विनाकारण अपात्र ठरवण्यात आले होते. तिने तक्रार नोंदवल्यानंतर तिला धावण्याची संधी देण्यात आली. आशियाई स्पर्धांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अशा चुका होणे खूपच हास्यास्पद प्रकार आहे. किंबहुना, भारतीय खेळाडूंना विचलित करण्याचाच हा प्रकार असावा, अशी शंका अनेकांना आली होती.

धावण्याच्या शर्यतीत शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द ठेवली, तर सोनेरी यश मिळवता येते हे पारूल चौधरीने दाखवून दिले. 5 हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत तिने शेवटच्या 25 मीटर्स अंतरात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत सुवर्णपदक जिंकले. त्याआधी तिने तीन हजार मीटर स्टीपल चेसमध्ये रौप्यपदक पटकावले होते. पुरुष गटामध्ये महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडू अविनाश साबळे याने तीन हजार मीटर स्टीपल चेसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले तसेच 5 हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आणि आगामी ऑलिम्पिकच्या द़ृष्टीने आपल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

अश्वारोहणसारख्या खर्चिक क्रीडा प्रकारात भारताने 41 वर्षांनी सुवर्णपदक जिंकले. या क्रीडा प्रकारामध्ये अश्वारोहण करणार्‍या खेळाडूबरोबरच अश्वाचे कौशल्य व मानसिकता महत्त्वाची असते. आपल्या खेळाडूंनी याबाबतीत अतुलनीय कामगिरी केली, असेच म्हणावे लागेल. तिरंदाजीसारख्या आव्हानात्मक खेळामध्ये महाराष्ट्राच्या ओजस देवतळे याने केलेली सोनेरी हॅट्ट्रिक व आरती स्वामी या उदयोन्मुख खेळाडूने जिंकलेले ब्राँझपदक ही कामगिरीदेखील प्रेरणादायी आहे.

भारताच्या कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वयाचा कोणताही अडथळा पदक जिंकण्याच्या मार्गात आला नाही. पंधरा वर्षीय खेळाडू अनाहत सिंग हिने स्क्वॅशमध्ये दोन ब्राँझपदके जिंकली, तर पंधरा वर्षीय संजनाकुमारी हिने रोलर स्केटिंगमध्ये ब्राँझपदकावर नाव कोरले. जग्गी शिवदासानी यांनी वयाच्या 65 व्या वर्षी ब्रिजमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली. रोहन बोपन्ना हा टेनिसच्या द़ृष्टीने प्रौढ खेळाडू मानला जातो; परंतु त्याने वयाच्या 43 व्या वर्षी ऋतुजा भोसले या युवा खेळाडूच्या साथीत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले आणि मुलखावेगळी कामगिरी केली. स्क्वॅशमध्ये दीपिका पल्लीकल या ज्येष्ठ खेळाडूने हरिंदरपाल सिंग या नवोदित खेळाडूच्या साथीत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले. सौरव घोशाल हादेखील स्क्वॅश या खेळाच्या द़ृष्टीने प्रौढ खेळाडू मानला जातो. मात्र, त्याने अन्य नवोदित खेळाडूंच्या साथीत भारतास सांघिक विभागात विजेतेपद मिळवून दिले.

भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीची दवडलेली संधी हीदेखील अनपेक्षितच गोष्ट होती. कारण, भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये चौथे स्थान घेतले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरीच अपेक्षित होती. विशेषतः, ज्या प्रकारे त्यांनी स्पर्धेतील साखळी सामन्यांत आक्रमक खेळ केला होता तसा खेळ चीनविरुद्ध उपांत्य फेरीत दाखवण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरल्या; अन्यथा किमान अंतिम फेरीत आपण पोहोचू शकलो असतो. त्यातुलनेमध्ये भारतीय पुरुष संघाने धडाकेबाज खेळाचा प्रत्यय घडविला आणि सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला.
या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी होत असतानाच मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी चर्चेचा विषय ठरली. कुस्ती संघ निवडताना दिसून आलेले राजकारण, संघटना स्तरावरील गटबाजी, खेळाडूंनी सरावाऐवजी अन्य गोष्टींवर वेळ वाया घालविणे, अशा अनेक कारणांमुळे भारतीय खेळाडूंना कुस्तीमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही.

आगामी ऑलिम्पिकसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी हा उत्तम पाया रचला गेला आहे, असे मानून खेळाडूंनी आतापासूनच त्याद़ृष्टीने जोरदार तयारी केली पाहिजे. मुख्य म्हणजे, केंद्र शासन क्रीडा क्षेत्रासाठी सर्वतोपरी साहाय्य करीत आहे आणि यापुढेही करणार आहे. खेळाडूंनी अर्थार्जनाची चिंता करू नये. ही जबाबदारी आम्ही समर्थपणे सांभाळत आहोत. खेळाडूंनी फक्त सरावावर लक्ष केंद्रित करावे, हा केंद्र शासनाने दिलेला संदेश खूपच बोलका आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी लक्षात घेतल्यास आगामी ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दोन आकडी पदके मिळवू शकतील, अशी अपेक्षा आहे.

Back to top button