दुर्दैवी ! बैलगाडा शर्यती दरम्यान ‘संग्राम’ बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

दुर्दैवी ! बैलगाडा शर्यती दरम्यान ‘संग्राम’ बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  शिवरी (ता. पुरंदर) येथील बैलगाडा शर्यतीमध्ये विहिरीत पडून शर्यतीतील बैल ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धीरज भांडवलकर यांचा 'संग्राम' हा बैल या शर्यतीमध्ये दुर्दैवाने धावपट्टीशेजारी असणार्‍या विहिरीत पडून जागीच ठार झाल्याने संपूर्ण बैलगाडा शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. नियमांची पायमल्ली करून ही शर्यत भरवली असल्याचा आरोप भांडवलकर यांनी केला आहे. या घटनेमुळे शिवरीतील बैलगाडा स्पर्धेच्या आयोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'संग्राम'चे मालक धीरज भांडवलकर व बैलगाडामालक व बैलगाडा शर्यत चाहत्यांनी आयोजकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात ढिसाळ नियोजन हेच 'संग्राम'चा बळी घेण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

नियमानुसार ज्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले जाते, त्या ठिकाणची पाहणी संबंधित अधिकार्‍यांकडून केली जाते. धावपट्टी आणि मैदान बैलांसाठी सुरक्षित असेल, तरच शर्यतीला परवानगी दिली जाते. यासाठी अधिकार्‍यांनी स्पर्धेच्या मैदानाला भेट देऊन त्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेले आहे का नाही? हे पाहणे आवश्यक असते. परंतु, 'संग्राम'चे मालक धीरज भांडवलकर यांनी शिवरी येथील स्पर्धेला दिलेल्या या परवानगीवरच आक्षेप घेतला आहे. धीरज भांडवलकर यांच्या म्हणण्यानुसार शिवरीतील बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी कोणत्याही अधिकार्‍यांनी भेट दिलेली नाही. घाईघाईने स्पर्धेच्या आधीच्या रात्री साडेसात वाजता परवानगी देण्यात आली. ज्या ठिकाणी विहिरीमध्ये 'संग्राम' पडला त्या विहिरीमध्येच या स्पर्धेत अवघ्या अर्धा तासांपूर्वीच 'लक्ष्या' नावाचा बैलदेखील पडला होता. आता एक बैल त्या विहिरीत पडल्यानंतर स्पर्धा त्या ठिकाणी थांबविणे गरजेचे होते व त्या विहिरीच्या ठिकाणी बॅरिकेड लावणे गरजेचे होते. परंतु, आयोजकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले व स्पर्धा चालू ठेवली. जवळच विहीर असताना या मैदानाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न बैलगाडा शर्यतशौकीन विचारात आहेत.

बैलगाडा शर्यती चालू होण्यामागे मोठा संघर्ष आहे. बैलगाडा शर्यत हे ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून आणि बळीराजाच्या करमणुकीचे साधन म्हणून मोठ्या संघर्षाने या बैलगाडा शर्यतींना मान्यता मिळाली आहे. परंतु, अशा प्रकारच्या आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे या बैलगाडा शर्यतींना गालबोट लागत आहे. लाखमोलाचा बैल गमावण्याची वेळ बैलमालकांवर यामुळे येते.
धीरज भांडवलकर यांनी पोटच्या पोराप्रमाणे माया लावून लहानाचे मोठा केलेल्या 'संग्राम'ला साश्रुनयनांनी निरोप दिला. या वेळी 'संग्राम' या बैलाचे शेकडो चाहते उपस्थित होते. त्यांनी आपल्या लाडक्या 'संग्राम'ला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिला. 'संग्राम'च्या जाण्याने पुरंदरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, यापुढे तरी बैलगाडा शर्यत भरविताना कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्हायला पाहिजे, अशी मागणी बैलगाडाशौकीन करीत आहेत.

आयोजक माणुसकी विसरले
बैलगाडा शर्यतीचे शौकिन, 'संग्राम'चे चाहते, 'संग्राम'चे मालक यांच्याकडून आणखी एका बाबीवर अत्यंत संताप व्यक्त केला जातो आहे. ज्या वेळी 'संग्राम' विहिरीमध्ये पडला आणि तो मरण पावला त्या वेळी सर्वजण आग्रह करीत होते की स्पर्धा थांबवा. परंतु, आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले व स्पर्धा पुढे चालू ठेवली. सत्कार समारंभ चालू ठेवले. मुक्या जनावरांनादेखील माणुसकीची वागणूक मिळायला हवी, हेच आयोजक विसरले. असे गंभीर आरोप आता अनेक प्रेक्षकांकडून देखील केले जात आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news