Navratri 2023: नवरात्री उत्सव व उपासना; जाणून घ्या याविषयी | पुढारी

Navratri 2023: नवरात्री उत्सव व उपासना; जाणून घ्या याविषयी

रमा सुरेंद्र

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आदिशक्ती दुर्गादेवीचा उत्सव सुरू होतो. तिच्या विविध रुपांची या दिवसात पूजा केली जाते. नवरात्र उत्सवात केल्या जाणार्‍या या व्रताची माहिती थोडक्यात जाणून घेऊ. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी, असे नऊ दिवस देवीने असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश केला. म्हणून हे नऊ दिवस शक्तीची उपासना या रुपात व्रत म्हणून साजरे होतात. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, यासाठी रामाला नारदाने हे व्रत करायला सांगितले. हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

देवीची स्थापना किंवा घटस्थापना:  या पूजेला बर्‍याच घरात कुळाचाराचे स्वरूप असते. घरात स्वच्छ जागी एक वेदी तयार करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजा देवी आणि नवार्णव यंत्राची स्थापना करावी. या शेजारी घटस्थापना करण्यासाठी वावरी अर्थात शेतातील मातीचा थर करून त्यामध्ये सप्तधान्य किंवा कुळात परंपरा असेल त्याप्रमाणे धान्याची पेरणी करावी. नंतर मातीच्या घटात फुले, दुर्वा, अक्षता, पाणी, सुपारी आणि नाणे घालून तो मातीच्या थरावर ठेवावा. कुळाचारानुसार काही ठिकाणी सप्तमीच्या दिवशी यावर फुलोरा बांधला जातो. तर काही ठिकाणी अष्टमीची पूजा असते.

कुमारिका पूजन: कुमारिका म्हणजे देवीची अप्रकट शक्ती असे मानले जाते. त्यामुळेच या शक्तीचा जास्तीत जास्त फायदा होण्याच्या द़ृष्टीने कुमारिकांना भोजन घालावे, अशी परंपरा आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज कुमारिकेची पूजा केली जाते.

अखंड दीपाचे महत्त्व: नवरात्रीच्या दिवसांमध्ये नऊ दिवस अखंड दीपप्रज्वलन केले जाते. गुजरातमध्ये मातीचा छिद्र असलेला घट घेऊन त्यामध्ये दिवा पूजला जातो. हे मातृशक्तीचे प्रतीक म्हणून दीपगर्भाच्या रूपात पूजले जाते. अखंड दिवा काही कारणामुळे विझल्यास ती कारणे दूर करून दिवा परत प्रज्वलित करावा आणि प्रायश्चित्त म्हणून अधिष्ठात्या देवतेचा 108 किंवा 1000 वेळा जप करावा.
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही देवीची प्रमुख तीन रूपे आहेत. पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी सत्त्वगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधनेला धार येण्यासाठी रजोगुणी महासरस्वतीची पूजा केली जाते.

देवीला वाहण्यात येणारी फुले: विशिष्ट फुलांनी विशिष्ट देवतांचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होत असते. मोगर्‍यामध्ये दुर्गादेवीचे, गुलाबामध्ये लक्ष्मी देवीचे तत्त्व आकृष्ट होते. म्हणून त्या-त्या देवीची पूजा करताना ती ती फुले वहावीत. आदीशक्तीच्या सर्व रुपांना फुले वाहताना ती 9 च्या किंवा त्या पटीत वहावीत.

कुंकुमार्चन: देवीचा नामजप करत चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून डोक्यापर्यंत वाहणे म्हणजे कुंकुमार्चन होय. कुंकवामध्ये देवीचे तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता जास्त आहे. म्हणूनच देवीला कुंकुमार्चन केल्यानंतर देवीच्या मूर्तीतील शक्तितत्त्व कुंकवामध्ये येते आणि आपण ते वापरल्यास ते आपल्यापर्यंत पोहोचते, असे मानले जाते.

देवीचा ओटी: देवीला खण, साडी अर्पण करणे म्हणजे देवीच्या निर्गुण-निराकार रुपाला आपल्या कल्याणाचे कार्य करण्यासाठी बोलावणे होय. देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण, या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. दुर्गादेवीला लाल रंगाची साडी अर्पण करावी; तर लक्ष्मीला लाल आणि केशरी, सरस्वतीला पांढरा आणि लाल तर महाकाली देवीला जांभळा आणि लाल असे दोन रंग असलेल्या साड्या अर्पण कराव्यात. या रंगांमुळे कमी कालावधीत देवीचे तत्त्व जागृत होते. देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करावी. कारण, या साडीतील नऊवार हे देवीची नऊ रूपे दर्शवतात. अशी साडी अर्पण करणे म्हणजे श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय असे मानले जाते.

नवदुर्गा पूजन: नवरात्रात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीचा नामजप करणे महत्त्वाचे असते. कलियुगातील ही सर्वात श्रेष्ठ आणि सोपी अशी उपासना आहे.

Back to top button