तीन दिवस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनास बंदी | पुढारी

तीन दिवस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनास बंदी

लोणावळा(पुणे) : येथील सुप्रसिद्ध कार्ला एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने भाविकांची आणि पर्यायाने वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे यात्रा कालावधीत कार्लाफाटा ते वेहेरगाव या रस्त्यावर आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही मार्गावर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आली आहे.

एकवीरा देवीच्या यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी या अनुषंगाने पर्यायी उपाययोजना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान कार्लाफाटा ते एकवीरा देवी पायथा मंदिर या मार्गावर जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तर, 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक लोणावळा व तळेगाव येथून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

  • कार्लाफाटा ते एकवीरादेवी पायथा मंदिर दरम्यान 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी.
  • 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा-कुसगाव बुद्रुक टोलनाका-वडगाव फाटा मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा कुसगाव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूने वळविण्यात आली आहे.
  • 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन वडगाव तळेगाव फाटा-लोणावळा मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगावफाटा येथून उसे खिंड, उसे टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन मुंबई बाजूकडे जातील.

हेही वाचा

Pune Hotel News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई

निळवंडे कालव्यातून आज सुटणार पाणी..! : महसूलमंत्री विखे पाटील

Back to top button