Pune Hotel News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई | पुढारी

Pune Hotel News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील अनधिकृत रुफटॉप हॉटेलला अभय देत ते नियमित करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाची दिसत होती. त्याबाबत टीका झाल्याने अखेर महापालिकेने आता कारवाई सुरू केली आहे. मागील चार दिवसांत विविध भागातील 9 रुफटॉप हॉटेलवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली आहे.

शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी, आकुर्डी या भागांत मोठ्या संख्येने रुफटॉप हॉटेल आहेत. इमारतीच्या गच्चीवर हे हॉटेल चालविले जातात. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने काही महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात 48 रुफटॉप हॉटेल आढळून आले होते. अग्निशमन विभागाने या हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर काही हॉटेल बंद करण्यात आली. मात्र, काही हॉटेलमालकांनी नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे महापालिकेने आता प्रत्यक्ष अशा हॉटेलवर कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, शहरात सुमारे 100 रुफटॉप हॉटेल असल्याचा अंदाज आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने वाकड, विशालनगर व पिंपळे सौदागर येथील 7 आणि ग क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने थेरगाव परिसरातील दोन अशा एकूण 9 रुफटॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सर्व धोकादायक व अनधिकृत रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत सर्व रुफटॉप हॉटेल पाडणार

आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृतपणे तयार करण्यात आलेल्या रुफटॉप हॉटेलवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 9 अनधिकृत हॉटेलवर कारवाई झाली आहे. परवानगी नसलेल्या शहरातील सर्व रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.

हेही वाचा

कोणी काम देता का काम? उद्योगनगरीत शेकडो बेरोजगार कामाच्या प्रतीक्षेत

तर्कतीर्थांच्या पिंपळनेरातील घराला प्रा. राजा दिक्षीत यांनी दिली भेट

Back to top button