निळवंडे कालव्यातून आज सुटणार पाणी..! : महसूलमंत्री विखे पाटील | पुढारी

निळवंडे कालव्यातून आज सुटणार पाणी..! : महसूलमंत्री विखे पाटील

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  निळवंडे कालव्याचे पाणी आज (शनिवारी) सोडण्यात येणार आहे. दरम्यान, याच आवर्तनात कोपरगाव शाखा कालव्याला पाणी देण्याचा प्रयत्न आहे असे सांगत, या कालव्याच्या कामाकरीता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा आता संपणार असल्याचा ठाम विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केला. राहाता तालुक्यातील केलवड येथे निळवंडे कोपरगाव शाखा कालव्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे , तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे पा. म्हणाले की, अकोले तालुक्यातील पहिल्या 22 कि. मी. अंतरावरील काम सुरू झाल्यानंतर खर्‍या अर्थाने कालव्याच्या कामांना वेग आला. यासाठी युती सरकार सत्तेत यावे लागले. पाण्याची प्रथम चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली, परंतु काही ठिकाणी कालव्यांना गळती असल्याने तेथील शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेवून पाणी बंद करावे लागले. पावसानेही काम करण्यात अडथळे आले, परंतु या विभागाच्या अधिकार्‍यांनी ही सर्व काम पूर्ण केली आहेत. आज शनिवारी पाणी सोडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केलवड येथील शाखा कालव्याला या आवर्तनात पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासित करून या कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे काम लवकरात- लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देवून, मंत्री विखे यांनी सांगितले की, कामातील अडचणी कोणी विचारत घेत नाही, पण विखे पाटील पाणी येवू देत नाहीत, हा आरोप केला जातो. अनेक ठिकाणी ठेकेदारांनी काम जाणीवपुर्वक बंद ठेवली आहेत. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचे मंत्री विखे पा. यांनी ठणकावून सांगितले.

केलवड येथील कामात कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी सर्व मशिनरीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. दुष्काळी परीस्थीतीत या पाण्याचा दिलासा मिळेल. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. तरी सुदैवाने धरणं भरली असली तरी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत मात्र जिल्ह्याच्या मानगुटीवर कायम आहे. मेंढीगिरी समितीच्या अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी राज्य सरकारने जुलै महिन्यात समिती गठीत केल्याने या संकटातही कसा मार्ग निघेल, हा प्रयत्न आपला असल्याचे मंत्री विखे पा. यांनी यावेळी आवजूर्न नमूद केले.

वर्षानुवर्षांची पाण्याची प्रतिक्षा आता संपणार..!
कोपरगाव शाखा कालव्याला पाणी देण्याचा प्रयत्न आहे असे सांगत, या कालव्याच्या कामाकरीता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने वर्षानुवर्षे शेतकर्‍यांना असलेली पाण्याची प्रतिक्षा आता संपणार असल्याचे ठामपणे सांगत, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी याकामी लक्ष असल्याचे स्पष्ट केले.

Back to top button