कोणी काम देता का काम? उद्योगनगरीत शेकडो बेरोजगार कामाच्या प्रतीक्षेत | पुढारी

कोणी काम देता का काम? उद्योगनगरीत शेकडो बेरोजगार कामाच्या प्रतीक्षेत

भास्कर सोनवणे

आकुर्डी(पुणे) : उद्योगनगरीत आपल्या हाताला काही ना काही काम मिळेल, या अपेक्षेने शहरातील मजूर अड्ड्यावर शेकडोच्या संख्येने बेरोजगार कामाच्या प्रतीक्षेत शहरात येतात. कष्ट करण्याची, वाटेल ते काम करण्याची तयारी असूनही कोणी काम देतं का काम, अशी आर्त हाक सोलापूरहून आलेले सोमनाथ निकुंबेसारख्या अनेकजण देत आहेत. शहरातील हे चित्र चिंतीत करणारे आहे. एकंदरीत या कष्टकर्‍यांचे चेहरे काम नाही तर दाम नाही, याची आठवण करून देतात.

चार दिवसांपासून घरून रोज डबा घेऊन येत आहे. मजूर अड्ड्यावर काम मिळेल या आशेने रोज दुपारी दोनपर्यंत थांबूनही शेवटी निराश होऊन रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे अंबादास करकमकर यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरात कामाच्या शोधार्ध आलेले काही मजूर बिजलीनगर येथील मजूर अड्ड्यावर दिसून आले, त्यापैकी काहींनी चार दिवसांपासून घरून रोज डबा घेऊन येतो; मात्र हाताला काम मिळत नसल्याचे सांगितले.

मजूर अड्ड्यावर काम मिळेल या आशेने रोज दुपारी दोनपर्यंत थांबूनही शेवटी निराश होऊन रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे बजरंग गायकवाड याने सांगितले. विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, बीड तसेच परराज्याहून आर्थिक संकट ओढावल्याने, गावाकडील दुष्काळी परिस्थिती, कारखान्यांचा अभाव, पाण्याचे संकट अशा अनेक कारणांमुळे काही तरुणांनी शहराकडे रोजी रोटीसाठी वाट धरली. उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधार्थ तसेच कुटुंबाची गुजराण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड गाठल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगत असतानाच काहींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

राज्याच्या कानाकोपर्‍यांतून रोज अनेक जण शहराची वाट पकडतात. तासनतास प्रतीक्षा करूनही हाताला काम नाही. राज्याच्या कानाकोपर्‍यांतून तसेच परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येनेही शहराच्या विविध भागात आले आहेत. रोजगार मिळावा म्हणून मजूर अड्ड्याचा आधार घेतात. यातील अनेकजण अशिक्षित असल्याने रोजगार मिळावा, म्हणून येथील मजूर अड्ड्यांचा आधार घेतात. काही मजूर अड्ड्यावर तासनतास प्रतीक्षा करूनही हाताला काम मिळत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

काम मिळण्याची शाश्वती नाही

सकाळी आठ वाजेपासून काही तरुण घरून मिळेल तो जेवणाचा डबा घेऊन मजूर अड्ड्यावर काम मिळवण्यासाठी रोज येऊन बसतात. काम मिळेलच याची शाश्वती नाही. मिळेल ते काम करण्याची तयारी या तरुणांनी बोलून दाखविली. अशाच प्रकारे शेकडोच्या संख्येने रोजगार मिळविण्यासाठी घर सोडून शहरात दाखल झालेल्या काही तरुणांवर याची वेळ आली आहे.

खर्चाची जुळवाजुळव करताना होते दमछाक

घराबद्दल विचारले असता या तरुणांनी सांगितले, सध्या शिंदे वस्ती, किवळे, आकुर्डी, बिजलीनगर आदी परिसरात, झोपडपट्टीत आम्ही दहा बाय दहाच्या घरामध्ये राहतो. काहींचे आई-वडील गावाकडेच राहतात. उत्पन्नाचे साधन नाही. शेती नाही. कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी गाव सोडून शहराकडे आल्याचे त्यांनी सांगितले. घरभाडे, किराणा, भाजीपाला, दवाखाना या खर्चाची जुळवाजुळव करताना दमछाक होते.

दुचाकीवरून कोणी आल्यास त्याच्या भोवती सर्व घोळका करतात. काम मिळेल अशी आशा लागते. यामध्ये महिला मजुराला 400 ते 500 रुपये व पुरुष मजुराला 600 ते 700 रुपयांपर्यंत मजुरी मिळते. या पेक्षा कमी मजुरीत काम करण्याचीही त्यांची तयारी असते. आठवड्यातील सात दिवस हे मजूर अड्ड्यावर येतात, मात्र तीन किंवा चार दिवसच त्यांना काम मिळते. कधी कधी दुपारच्या चार वाजेपर्यंत काम मिळेल म्हणून वाट पहावी लागते. कधी कधी आणलेले जेवण इथेच खाऊन घरी जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. दररोज काम मिळत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे त्याने सांगितले. या मजुरांमध्ये 20 वर्षांपासून 60 ते 65 वयोगटांतील मजूर या अड्ड्यावर आल्याचे दिसून आले. मजुरांच्या चेहेर्‍याकडे पाहून मात्र केवळ दोन वेळेच्या अन्नासाठीची ओढ सुन्न करणारी आहे.

मेट्रो स्टेशन, शहरातील उड्डाणपूल कामांसंदर्भात मजूर अड्ड्यावरील कामगारांना आम्ही आवर्जून काम देतो. स्थलांतरित कामगारांची गुणवत्ता पाहून त्यांना काम दिले जाते. परंतु, बहुतेक कामगार हे अशिक्षित आहेत. त्यांना महापालिकेने प्लंबर, वेल्डिंग, सुतारकाम किंवा वायरिंगचे कामाचे प्रशिक्षण द्यावयास हवे. थोडक्यात त्यांना स्किलचे मोफत प्रशिक्षण द्यावयास हवे. आजकाल आधुनिक पद्धतीने काम केले जाते. त्यांनाही आधुनिक पद्धतीचे नवनवीन फंडे द्यावयास हवे. विविध प्रकारचे कामाचे नॉलेज दिल्यास त्यांना रोजगार मिळेल. पालिकेनेही रोजगार मेळाव्याचे आयोजन करावयास हवे.

– काशीनाथ नखाते, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ.

हेही वाच

आरक्षणासाठी एकजुटीने रस्त्यावरची लढाई सुरुच ठेवा : आमदार गोपीचंद पडळकर

तर्कतीर्थांच्या पिंपळनेरातील घराला प्रा. राजा दिक्षीत यांनी दिली भेट

निळवंडे कालव्यातून आज सुटणार पाणी..! : महसूलमंत्री विखे पाटील

Back to top button