पुणे; पुढारी वृत्तसेवा : जोखमीचे घटक माहीत नसल्यामुळे बालपणातील कर्करोगाचे बरेचदा लवकर निदान होत नाही. त्यामुळे उपचारांना विलंब होऊ शकतो. म्हणूनच कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागृती होण्यासाठी विविधस्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. ल्युकेमिया, ब्रेन ट्यूमर, लिम्फोमा आणि न्युरोब्लास्टोमा, विल्म्स ट्यूमर यांसारखे कर्करोग लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत.
कर्करोग होण्याची शक्यता निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, कमी तणावपूर्ण जीवन या निकषांनी कमी होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बालपणातील कर्करोग प्रौढ कर्करोगापेक्षा बरेच वेगळे असतात. प्रौढांच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे धूम्रपान, लठ्ठपणा इत्यादी जीवनशैलीच्या सवयींशी संबंधित कर्करोग लहान मुलांमध्ये आढळून येत नाहीत. जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे पेशींची असामान्य वाढ होते. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. अनुवांशिक उत्परिवर्तनांसाठी रेडिएशनसारखी काही कारणे असू शकतात. मात्र, लहान मुलांच्या कर्करोगाची कारणे बरेचदा अज्ञात असतात.
बालपणातील कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी जागरूकता मोठी भूमिका बजावू शकते. सुरुवातीच्या टप्प्यावर लवकर निदान केल्याने कर्करोगामुळे होणारी गंभीर अवस्था आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. सुरुवातीच्या टप्प्यात केमोथेरपी आणि रेडिएशनसारख्या उपचारांचा अतिसौम्य स्वरूपात वापर केला जातो. त्यामुळे दुष्परिणाम कमी होतात आणि उपचारानंतर मूल सामान्य जीवन जगू शकते.
– डॉ. श्वेता बन्सल, बालरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट आणि बीएमटी फिजिशियन, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
अचूक आणि वेळेवर आणि अचूक मूल्यमापन, निदान आणि कर्करोगाचा प्रसार किती प्रमाणात झाला आहे हे निर्धारित केल्यावर उपचारांसाठी त्वरित प्रवेश घेता येतो. बालपणात ताप, तीव्र आणि सततची डोकेदुखी, हाडे दुखणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. डॉक्टरांचे उपचार सुरू ठेवतानाच कुटुंबाचा पाठिंबा खूप गरजेचा असतो.
– डॉ. पंकज क्षीरसागर, सल्लागार ऑन्कोसर्जन, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी.
हेही वाचा