Nitin Gadkari : सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात ! नितीन गडकरी | पुढारी

Nitin Gadkari : सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्थापित करू शकतात ! नितीन गडकरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या जगभरात वर्ण, जातिभेद यावरून आपण अशांतता माजल्याचे पाहतो. परंतु, दुसरीकडे भारत ‘वसुधैव कुटुंबकम्’चा जगाला संदेश देत आपल्या विविधततेतील एकतेमुळे भाषा, प्रांत आणि जातीपातीची बंधने तोडून देशात शांतता प्रस्थापित करताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्या देशाची विविधता हेच आपले सामर्थ्य आहे आणि सामर्थ्यवान माणसेच शांतता प्रस्तापित करू शकतात, असे मत रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 6व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी गडकरी बोलत होते. या प्रसंगी एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जीवनाशी व जीवनातील प्रत्येक गोष्टीशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतिक प्रगतीही तितकीच महत्त्वाची असते. विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो आणि अशाच प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे काम या विद्यापीठाकडून घडत आहे. देशाला पुढे घेऊन जायचे असल्यास आपल्या संशोधनाला आणखी आघाडीवर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.

या प्रसंगी भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)चे माजी चेअरमन डॉ. ए. एस. किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात आले. एकूण 2 हजार 805 विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली. डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा

Nashik News : गंगापूर धरणातील पाण्याचा बदलतोय रंग ; पाणी प्रदूषित? 

Rohit Pawar : शिक्षणक्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा : रोहित पवार

Pune Metro Newsपीएमपी मेट्रो फिडर सेवा धीम्या गतीने

Back to top button