Pune Metro News : पीएमपी मेट्रो फिडर सेवा धीम्या गतीने | पुढारी

Pune Metro News : पीएमपी मेट्रो फिडर सेवा धीम्या गतीने

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रोची प्रवासी सेवा अद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांकडून प्रत्यक्षात पूर्णपणे मेट्रोचा वापर सुरू झालेला नाही, त्यामुळे बुधवारी (दि. 12) केलेल्या पाहणी दरम्यान पीएमपीच्या मेट्रो फिडर सेवेलादेखील प्रवाशांचा प्रतिसाद थंडच असल्याचे दिसले. मात्र, उपनगर भागांत मुख्य मार्गांवर असलेल्या मेट्रो स्थानकांखाली इतर प्रवाशांच्या गर्दीमुळे पीएमपीच्या फीडर बसदेखील भरून जात असल्याचे दिसले.

पीएमपीकडून सुरू असलेल्या मेट्रो फिडर सेवेची दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने पाहणी केली. या बस प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध होत आहेत का, मेट्रो प्रवाशांना आणखी बसची गरज आहे का? याची या वेळी पाहणी करण्यात आली. त्यावेळी पीएमपीच्या मेट्रो फिडर सेवेला प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती असलेल्या सिव्हिल कोर्ट स्थानकात पाहणी केली असता पीएमपीच्या मपुण्यदशमफ मिडी बस येथे पाच-पाच मिनिटांनी स्थानकावर येत असल्याचे दिसले. मात्र, या गाड्या रिकाम्याच धावत होत्या. हडपसरसाठी इलेक्ट्रिक बस ब-याच वेळेपासून उभी होती.

चालक-वाहक म्हणाले…

पीएमपीचे चालक-वाहक यांच्याशी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकावर या प्रतिनिधीने संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या गाडीसह अनेक मिडी बस मेट्रो स्थानकावर फिडर सेवा पुरवत आहेत.मात्र, वीकेंड आणि पीक अवरमध्ये बर्‍यापैकी प्रवासी असतात. मुख्यत्वे शनिवारी, रविवारी प्रवाशांची फिडर सेवेला गर्दी असते.

नळस्टॉपला गाड्या वाढविण्याची गरज…

बुधवारी केलेल्या पाहणीदरम्यान मेट्रोच्या सुरू असलेल्या स्थानकांवर फिडर सेवेला प्रतिसाद थंड असल्याचे पहायला मिळाले. मात्र, याउलट नळस्टॉप मेट्रो स्थानकाखाली प्रवाशांसाठी बस गाड्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे चित्र दिसले. कारण, येथे मेट्रो प्रवाशांसोबतच इतर पीएमपीच्या प्रवाशांची देखील मोठी गर्दी होती.

रूबी हॉलजवळ व्यवस्थेची गरज

मेट्रोच्या इतर स्थानकांपेक्षा सर्वाधिक प्रवाशांची ये-जा रूबी हॉल मेट्रो स्थानकावरून होत असल्याची नोंद मेट्रो प्रशासनाने अनेकदा केली आहे. या ठिकाणाहून सर्वाधिक मेट्रो प्रवासी प्रवास करतात.

पर्यावरणपूरक फीडर सेवा गायब…

मेट्रो प्रशासनाकडून मेट्रो स्थानकाखाली पर्यावरणपूरक फीडर सेवा पुणेकरांना उपलब्ध करून दिली होती, यात
ई-बाईक, ई-सायकल आणि ई-अ‍ॅटो यांचा समावेश होता. मात्र, ही पर्यावरणपूरक फीडर सेवा सध्या मेट्रो स्थानकाखालून पूर्णतः गायब झाली असून, त्या जागी आता दुचाकीस्वारांचे पार्किंग दिसत आहे. हे पार्किंगदेखील पुणेकरांना अपुरे पडत आहे.

अशी आहे पीएमपीची फीडर सेवा….

शटल क्र. 1 : वनाज मेट्रो स्टेशन (वर्तुळ) मार्गे कुंवरपार्क, सुतार दवाखाना.
शटल क्र. 3 : वनाज मेट्रो स्टेशन-आनंदनगर मार्गे परमहंसनगर, रामबाग कॉलनी.
शटल क्र. 15 : शिवाजीनगर मेट्रो स्टेशन- पुणे स्टेशन मार्गे संगमवाडी, बंडगार्डन.
शटल क्र. 16. : पुणे स्टेशन-मुंढवा गाव मार्गे रुबी हॉल, कोरेगाव पार्क.
शटल क्र. 17 : हडपसर-शिवाजीनगर- सिव्हिल कोर्ट मार्गे कलेक्टर कचेरी, पुलगेट.
शटल क्र. 40 : डांगे चौक-डांगे चौक (वर्तुळ) मार्गे चिंचवडगाव, लिंक रोड, पिंपरी-चिंचवड म. ना. पा. मेट्रो स्टेशन, डिलक्स चौक, तापकीर चौक, थेरगाव गावठाण.
मेट्रो शटल क्र. 41 : डांगे चौक-डांगे चौक (वर्तुळ) – थेरगाव गावठाण, तापकीर चौक, डिलक्स चौक, भाटनगर, पिंपरी-चिंचवड मेट्रो स्टेशन, चिंचवडगाव.
के 21 बावधन गाव : वनाज मेट्रो स्टेशन मार्गे चांदणी चौक, कोथरूड डेपो.

मेट्रोसाठी पीएमपीच्या 26 फीडर सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. काही ठिकाणी या बसगाड्यांना प्रतिसाद चांगला नाही. मात्र, फीडरसह अन्य मार्गांवरील प्रवाशांच्या वाहतुकीचेसुद्धा आम्ही या गाड्यांमार्फत नियोजन केले आहे. त्यामुळे तसा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मेट्रोचे सर्व मार्ग ज्यावेळी सुरू होतील तेव्हा आमच्या गाड्यांना नक्कीच प्रतिसाद वाढेल, असा विश्वास आहे.

सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

हेही वाचा

Rohit Pawar : शिक्षणक्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा : रोहित पवार

Lalit Patil Drug Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात हवालामार्फत व्यवहार ?

Ajit Pawar : प्रारूपरचनेत आवश्यक बाबींचा समावेश करा : उपमुख्यमंत्री

Back to top button