Lalit Patil Drug Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात हवालामार्फत व्यवहार ? | पुढारी

Lalit Patil Drug Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात हवालामार्फत व्यवहार ?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्करी प्रकरणात हवालामार्फत व्यवहार केला असल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. ललित पाटील आणि भूषण पाटील यांच्यामार्फत पैशाचा व्यवहार करत असल्याचीही माहिती आता समोर येत आहे. पाटील बंधूंनी भारतातील मार्केट लक्ष्य केले होते. पाटीलच्या नाशिक येथील कारखान्यात दररोज 20 ते 50 किलो ड्रग्जची निर्मिती केली जात होती. त्याची कोट्यवधींमध्ये ड्रग्ज डिलिंग सुरू होते. हे डिलिंग ते हवालामार्फत करत असल्याचाही संशय आता व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या त्याच्या कारखान्यात बनलेल्या मेफेड्रॉनच्या तस्करीची जबाबदारी ललित पाटीलकडे होती. तर, अभिषेक बलकवडेकडे मार्केटिंगची जबाबदारी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

ललित, भूषण आणि अभिषेक या त्रिकुटाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत भूषण आणि बलकवडे यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात त्यांचा साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या ताब्यातून पाटील बंधूंनी ठेवण्यास दिलेले 1 कोटी 80 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या तीन किलोचे सोने वितळवून एक एक किलोच्या तीन पेट्या बनविण्यात आल्या होत्या.

तत्पूर्वी 1 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून होणारा ड्रग्ज तस्करीचा धंदा उघड करीत पुणे पोलिसांनी मोठे रॅकेट उद्ध्वस्त करीत तब्बल 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज जप्त केले. ससून रुग्णालयाच्या वाॅर्ड क्र. 16 मधून ललित पाटील ड्रग्स डील करत होता. ललित पाटील याचे ‘उपचार मॅनेज’ करायला आणि इतर गोष्टँसाठी लागणारे पैसे हे ललितला हवालामार्फत मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात पुण्यातील एका बड्या व्यक्तीचा समावेश असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे.

  1. ड्रग्स विक्रीतून आलेल्या पैशातून ललित पाटील, भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली असल्याचे तपासात समोर आले आहे. अभिषेक बलकवडे याच्या घरी 3 किलो सोने सापडले आहे. बलकवडे याने या सोन्याच्या एक-एक किलोच्या प्लेट तयार केल्या होत्या. या सोन्याची किंमत 1 कोटी 80 लाख असल्याचे सांगितले जात आहे.
  2. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर त्याला मदत करत असणार्‍या एका महिलेचे नाव समोर येत होते. पुणे पोलिसांनी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याला अटक केल्यानंतर या महिलेची 12 तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  3. ससून रुग्णालयात बंदिवान म्हणून दाखल असताना ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी केलेले हे डिलिंग हे पुण्यातील पहिलेच डिलिंग असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु, त्यांचे मुंबईतदेखील डिलिंग सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मुंबईत होणारे डिलिंग हे ससून रुग्णालयातून झाले का ? पुण्यातील पहिले डिल होते की ? आणखी कितवे ? हे फरारी ललित याला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा

Sassoon drug Case : ससूनने कैद्यांचा अहवाल दडपला !

संधिवात आणि परिणाम, जाणून घ्या लक्षणे

Nashik News : तीन हप्तेखोर पोलिस निलंबित, पोलिस अधीक्षकांची कारवाई

Back to top button